वृत्तसंस्था/ चेन्नई
आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामासाठी माजी विजेत्या चेन्नईन एफसी संघाने आघाडी फळीतील नवोदीत फुटबॉलपटू कियान नसिरीशी नुकताच नवा करार केला आहे. नसिरी यापूर्वी कोलकाताच्या मोहन बागान संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.
कोलकाताच्या ईस्ट बंगाल संघाचे सर्वेसर्वा जमशेद नसिरी यांचा कियान हा मुलगा आहे. 23 वर्षीय कियानने 2019 साली वरिष्ठांच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये पदार्पण केले. चेन्नईन एफसी संघाने कियान नसिरीसमवेत शुक्रवारी करार केला असून या कराराचा कालावधी 3 वर्षांचा राहिल. 2027 पर्यंत नसिरी चेन्नईन एफसी संघाकडून खेळेल. कियानने आपल्या फुटबॉल कारकिर्दीला कोलकात्यातील फुटबॉल क्लबकडून प्रारंभ केला. त्याने काही दिवस मोहमेडन स्पोर्टींग क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो वरिष्ठ फुटबॉल क्षेत्रातील पदार्पण मोहन बागान क्लबकडून केले. कियानने 69 सामन्यांमध्ये 9 गोल नोंदविले आहेत. मोहन बागान संघाकडून दर्जेदार कामगिरी करताना कियान नसिरीने आपल्या या संघाला 2022-23 च्या आयएसएल चषक मिळवून दिला. तसेच 2023-24 या कालावधीत आयएसएल लीग शिल्ड स्पर्धा जिंकून दिली. तसेच 2023 साली मोहन बागान संघाने ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. 2022 साली मोहन बागानतर्फे कियान नसिरीची आघाडी फळीतील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली होती.









