वृत्तसंस्था/ दुबई
बांगलादेशचा अष्टपैलू नासिर हुसेनवर आयसीसीने दोन वर्षांची बंदी घातली आहे. संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी नियमाचा भंग केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. नासिर हुसेनने या प्रकरणातील सुनावणीवेळी आपले गुन्हे कबुल केले आहेत.
2023 च्या सप्टेंबर दरम्यान आयसीसीने नासिर हुसेनवर भ्रष्टाचार विरोधी आरोप ठेवले होते. संयुक्त अरब अमिरात क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचार विरोधी नियमाचे त्याच्याकडून उल्लंघन झाले होते. नासिर हुसेनला सुमारे 750 अमेरिकन डॉलर्स रकमेचा नवा फोन गिफ्ट म्हणून मिळाला होता. मात्र या भेटवस्तूची पावती तो भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्याकडे सोपवू शकला नाही. तसेच या संदर्भात त्याने कोणतीच माहिती दिली नाही. 2020 च्या अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेत नासिर हुसेनसह अन्य आठ व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते. नासिर हुसेनने आतापर्यंत 19 कसोटी, 65 वनडे आणि 31 टी-20 सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले असून त्याने आपला शेवटचा सामना 2018 साली खेळला होता.









