Ajit Pawar : महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात आहोत. मविआमध्ये कोणताही संभ्रम नाही.आमच्यात एकवाक्यता आहे. काल नाशिकमध्ये जे झालं ते काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, उद्या महाविकास आघाडीची संयुक्त बैठक असणार आहे. या बैठकीत नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूकीबाबत ऩिर्णय घेणार आहोत.सत्यजित तांबे यांच्या बंडामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक पदवीधरसंदर्भात बोलणं सुरु आहे. मी त्याबद्दल कॉंग्रेसला आधीच सावधान केलं होतं. मला आधीच कुणकुण लागली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांना कल्पना दिली होती. मात्र तरीही काल जे घडलं यामुळे भाजपला संधी मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
काँग्रेसकडून बंडखोरी केल्याबद्दल तांबे पिता-पुत्रावर कारवाई झाली आहे. शिवाय शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माझ्याशी देखील त्या बोलल्या आहेत. इतर सहकाऱ्यांशी बोलून मला सांगा,अशी सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मात्र काँग्रेसची याबाबत काय भूमिका आहे, हे समजून घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
Previous Articleबडगाम चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
Next Article शाहू छत्रपती चषकाचा राणादा स्पोर्टस् मानकरी








