बस कंडक्टर प्रकरणाचे चुकीचे पडसाद; नेहमीप्रमाणे भाषिक वादांमध्ये परिवहनच्या बसचे नुकसान हे ठरलेलेच
प्रतिनिधी/ बेळगाव
बसमध्ये चालक किंवा वाहकांबरोबर प्रवाशांची बाचाबाची नवीन नाही. एवढ्या तेवढ्या कारणावरून चालकाला किंवा वाहकाला कोणी मारहाणही करत नाही. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरता आले पाहिजे. जेव्हा याचे भान विसरले जाते तेथे द्वेषाची ठिणगी पडते आणि बघता बघता त्याचा वणवा होण्यास वेळ लागत नाही. जी अल्पवयीन मुलगी बसमधून प्रवास करत होती, तिने आपल्याला कानडी येत नाही असे सांगितल्यावर एक तर त्यावर काहीही प्रतिक्रिया न देणे किंवा कानडी शिक असा सल्ला देणे अशी भूमिका वाहकाला घेता आली असती.
तथापि त्या पलीकडे जाऊन भाषा शिकण्याबाबत तिच्याबरोबर ज्या पद्धतीने वाहकाने अनावश्यक सल्ला देताना जी भाषा वापरली ती अत्यंत गैर होती. जोपर्यंत ती मुलगी व वाहक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती, तोपर्यंत सर्व प्रवासीच शांत होते. परंतु वाहकाने ज्या पद्धतीने त्या मुलीशी बोलताना जी भाषा वापरली ती अर्थातच तिरस्करणीय होती. त्यामुळे तरुणांनी वाहकाला चपराक दिली. तरुणांचे हे कृत्य समर्थनीय नाहीच. मारहाणीमुळे प्रश्न सुटत नाहीत. अत्यंत सूज्ञपणे हा तिढा सोडविणे शक्य होते.
मात्र हे निमित्त भाषिक अस्मिता अणकुचीदार करण्यासाठी पुरेसे ठरले. या घटनेचे वेगळ्या पद्धतीने पडसाद उमटले. संघटनांचा त्यामध्ये शिरकाव झाला. वाहकाला मारहाण करणे हा मुद्दा बाजूलाच पडला. कर्नाटक परिवहनच्या वाहकाला मारहाण असा रंग त्याला देऊन राजकारण सुरू झाले. बघता बघता नेहमीप्रमाणे भाषिक वादांमध्ये परिवहनच्या बसचे नुकसान हे ठरलेलेच आहे.
कारणाशिवाय चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या बसच्या चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा निंदनीय प्रकार घडला. ज्या व्यक्तीचा या घटनेशी दुरान्वयानेही संबंध नाही त्याला असे लक्ष्य करण्याचे कारणच काय? एखाद्या निरपराध व्यक्तीला काळे फासण्यामध्ये शौर्य तर काही नाही. परंतु त्याच्या मनावरील या घटनेचे ओरखडे कधीही पुसले जाणार नाहीत. परिस्थिती माणसाला मनाविरुद्ध शरण येण्यास भाग पाडते. नोकरीची गरज असल्याने हा जिव्हारी लागणारा अपमान सहन करूनही त्याला नोकरी करावीच लागणार आहे. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत हा अपमान तो विसरू शकणार नाही. आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत की, दुसऱ्याचा विचार करणे याचा आपल्याला विसरच पडला आहे.
प्रशासन, पोलीस यंत्रणा व गरज पडल्यास लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी लक्ष घालून समन्वयाने तोडगा काढलाही असता. परंतु त्यांनासुद्धा तशी संधी न देता संघटना कायदा हाती घेऊ पाहतात, हे अधिक धोकादायक आहे. या सर्वांचा फटका अर्थकारणावरही बसणार आहे. दोन्ही राज्यांच्या बस शनिवारपासून आगारात थांबून राहिल्या आहेत. महाराष्ट्रातून बेंगळूरला जाणारी एकमेव बस आहे, तीसुद्धा धावू शकली नाही. परिणामी अत्यंत तातडीने ज्याना बेंगळूर गाठायचे होते त्यांची निष्कारण फरफट झाली. तीच गत मध्यवर्ती बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांचीही झाली.
परिवहनच्या बस, बसथांबे, सरकारी कार्यालये यांची मोडतोड करणे, अशी कोणतीच अस्मिता शिकवत नाही. आपणच निवडून दिलेल्या सरकारचे असे नुकसान करणे म्हणजे आपल्या गंज चढत चाललेल्या बुद्धीचेच लक्षण आहे. किमान विवेक बाळगला तर लहान-सहान प्रश्नांचे वेळीच निवारण करता येते. परंतु अशा घटनांमध्ये राजकारणाचा बेमालूमपणे शिरकाव करून त्यावर पोळी भाजून घेणाऱ्यांना कोणी आवरायचे? मारहाण कधीच समर्थनीय नाही, पण त्यावरून होणारे राजकारण खेदजनक आहे.









