प्रतिनिधी /बेळगाव
पुणे मराठी गंथालयातर्फे संगीत नाटय़क्षेत्रातील हौशी नाटय़ कलावंताला दिले जाणारे कै. नरहरबुवा पाटणकर पारितोषिक यंदा कु. अनुष्का आपटे हिला देण्यात आले.
पुणे येथे दिमाखदार सोहळय़ात हे पारितोषिक ज्येष्ठ नाटय़ कलावंत डॉ. राम साठय़े यांच्या हस्ते अनुष्काला देण्यात आले. अनुष्काचे शालेय शिक्षण बालिका आदर्श विद्यालय आणि मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे झाले आहे. पदवीपूर्व शिक्षण आरपीडीच्या कला विभागात पूर्ण करून सध्या ती पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) येथे बी. ए. थिएटरच्या तिसऱया वर्षात शिकत आहे.
लहानपणापासूनच नाटकाची तिला आवड आहे. मेधा मराठे यांच्या समर्थ दिग्दर्शनाखाली सं. सौभद्र, सं. शारदा आणि सं. स्वयंवर या नाटकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या.
पुणे येथील भरत नाटय़ संशोधन मंदिरातर्फे घेण्यात आलेल्या नाटय़गीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यावर त्यांच्या सं. शारदा नाटकात तिने शारदेची भूमिका केली. नुकतेच या नाटकाचे सहय़ाद्रीवर प्रक्षेपण झाले.
ती नाटय़गीते अगदी ताकदीने सादर करते, तिचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण मंजुश्री खोत यांच्याकडे झाले. नंतर श्रीधर कुलकर्णी यांच्याकडे आणि सध्या ती विदुषी अनुराधा कुबेर यांच्याकडे संगीताचे धडे घेत आहे.









