जेट एअरवेजची 538 कोटींची मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने 500 कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तांमध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, पत्नी अनिता गोयल आणि मुलगा निवान गोयल यांच्यासह लंडन, दुबई आणि भारतातील विविध राज्यांमधील कंपन्या आणि व्यक्तींच्या नावावर नोंदणीकृत 17 निवासी सदनिका, बंगले आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत किमान 538 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. नरेश गोयल यांच्याशिवाय जेट एअर प्रायव्हेट लिमिटेड आणि जेट एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर काही मालमत्ता नोंदणीकृत आहेत.
बँकेने दाखल केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ईडीने मंगळवारी नरेश गोयल आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. बँकेने एफआयआरमध्ये जेट एअरवेजला 848 कोटी रुपयांपर्यंतची व्रेडिट मर्यादा आणि कर्ज मंजूर केल्याचा आरोप केला आहे. त्यापैकी 538 कोटी रुपये थकीत आहेत.
नरेश गोयल यांना ईडीने 1 सप्टेंबर रोजी पीएमएलए अंतर्गत अटक केली होती. त्यांना मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. जेट एअरवेजच्या संस्थापकाने इतर देशांमध्ये ट्रस्ट तयार करून पैशांचे देव-घेव केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. नरेश गोयल यांनी या ट्रस्टचा वापर करून स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. जेट एअरवेजकडून घेतलेल्या कर्जाचा वापर मालमत्तेव्यतिरिक्त फर्निचर, कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी केल्याचे एका ऑडिट अहवालाचा हवाला देत अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे.









