सिग्निचर स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेत मिलिंद चव्हाण मालिकावीर, रोहित पोरवाल सामनावीर

बेळगाव : रोहित पोरवाल व मिलिंद चव्हाण यांच्या भेदक गोलंदाजाच्या जोरावर अंतिम सामन्यात युनियन जिमखानाने युवराज स्पोर्ट्स क्लबचा 7 गड्यांनी पराभव करुन नरेंद्र कुलकर्णी चषक पटकाविला. मिलिंद चव्हाण मालिकावीर तर रोहित पोरवाल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. य् ाgनियन जिमखाना मैदानावर सिग्निचर स्पोर्ट्स क्लब आयोजित किरण जाधव पुरस्कृत नरेंद्र कुलकर्णी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युवराज स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 15.4 षटकात सर्व गडी बाद 77 धावा केल्या. त्यात अजय बेनकेने 1 चौकारासह 20, बाळाप्पा होणगेकरने 16 धावा केल्या. जिमखानातर्फे मिलिंद चव्हाणने 6 धावात 3, रोहित पोरवालने 26 धावात 3, शुभम भादवणकरने 15 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 9.3 षटकात 3 गडी बाद 81 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात रोहित पोरवालने 1 चौकार 5 षटकारासह 32, रोहित देसाईने 1 षटकार 2 चौकारासह 16 तर मिलिंद चव्हाणने 1 षटकार 1 चौकारासह 12 धावा केल्या. युवराजतर्फे किरण तारळेकरने 32 धावात 3 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते किरण जाधव, महेश फगरे, स्वप्निल पुजारी, गजानन जैनोजी, प्रणय शेट्टी, चंदन कुदरनाड, परशराम पाटील, निशिल पोतदार, अभिजित भोहिते यांच्या हस्ते विजेत्या युनियन जिमखाना व उपविजेत्या युवराज स्पोर्ट्स क्लब संघाला चषक रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज रोहित पोरवाल (जिमखाना), उत्कृष्ट फलंदाज प्रशांत लायंदर (केआर शेट्टी), उत्कृष्ट यष्टीरक्षक ओम पाटील (अर्जुन), उगवता खेळाडू आदित्य वारांग (युवराज), स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू किरण तरळेकर (युवराज), अंतिम सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू व मालिकावीर मिलिंद चव्हाण (जिमखाना) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून महेश जवळी, शेहजाद पठाण तर स्कोरर म्हणून सुजित शिंदोळकर यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनिल गवी व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









