नऊ महिन्यात चार कोटीचे ड्रग्ज जप्त
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात ड्रग्जची प्रकरणे दुपटीने वाढली असून त्यात गोमंतकीयांचा सहभागही लक्षणीय असल्याने फार चिंतेची बाब बनली आहे. राज्यातून ड्रग्ज पूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी सरकार, पोलीस प्रयत्न करत आहे. मात्र गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत गोवा पोलीस खात्याने तब्बल 3 कोटी 83 लाख 29 हजार 512 रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने अंमलीपदार्थांचे हे जाळे किती विस्तारले आहे याची कल्पना येते. गेल्या 2021 सालात याच काळात 1 कोटी 69 लाख 75 हजार 700 रुपये किमंतीचे ड्रग्ज जप्त केले होते.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने गोव्यात पर्यटन हंगामात देशी-विदेशी पर्यटक मोठय़ाप्रमाणात येत असतात. देशी पर्यटक संपूर्ण वर्षभर येत असतात. विदेशांतून येणारा ड्रग्ज हा गोव्यात आल्यानंतरच त्याचे इतर राज्यात वितरण होत असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. गांजा, चरससारखा देशी ड्रग्स गोव्यात तयार होत नसला तरी इतर राज्यातून पर्यटक म्हणून येणारे हा ड्रग्ज गोव्यात घेऊन येत असल्याचेही उघड झाले आहे. गोव्यात पर्यटक मोठय़ाप्रमाणात येत असल्याने गोव्यात ड्रग्जला मोठय़ाप्रमाणात खप आहे, असा समज संगळ्याचाच झाला आहे, त्यामुळे अधिकाधिक ड्रग्ज विक्रेते गोव्यात येत असतात.

स्थानिकांचाही वाढता सहभाग
गेल्या काही वर्षापासून स्थानिक युवकही ड्रग्स व्यवहारात मोठय़ाप्रमाणात वळले असल्याचे दिसून येत आहे. झटपट पैसा मिळविण्याचे साधन असे समजून युवक या बेकायदेशीर व्यवसायाकडे वळत असतात. किनारी भागातील युवक मोठय़ा प्रमाणात या व्यवसायाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. 2021 सालात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ड्रग्स प्रकरणात 22 स्थानिक युवकांना अटक करण्यात आली होती, तर 2022 सालात याच काळात 31 स्थानिक युवकांना अटक करण्यात आली आहे. एकूणच दरवर्षी स्थानिक युवकांचा या बेकायदेशीर व्यवसायात सहभाग वाढत असल्याचे दिसून येत आहेत.
यावर्षी चार कोटींचे ड्रग्ज जप्त
जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात 3 कोटी 83 लाख 29 हजार 512 रुपये किमंतीचे 135 किलो विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यात एकूण 102 तक्रारी नोंद केल्या आहेत. 62 देशी नागरिकांना अटक केली असून 23 विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

अनेक विदेशींना झाली अटक
ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विदेशींमध्ये नायजेरियन 10, रशियन 3, युगांडा 1, जपान 1, बेलारूस 1, नेपाल 1, नेदरलँड 1, लिबेरिया 1, तांझानिया 2, युएसए 1, युके 1 यांचा समावेश आहे.
विविध प्रकारच्या ड्रग्जचा वापर
जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये 130 किलो 92 ग्रॅम गांजा, 1 किलो 584 ग्रॅम चरस, 78.3 ग्रॅम एलएसडी, 15.3 ग्रॅम एलएसटी टॅब्लेट, 130.86 ग्रॅम एक्सटासी, 598.81 ग्रॅम एमडीएमए, 341.6 ग्रॅम हेरॉईन, 2 किलो 286 ग्रॅम हशिष तेल, 24.4 ग्रॅम एम्फाटामाईन व अन्य प्रकारचे ड्रग्जचा समावेश आहे.
राज्याच्या बहुतांश भागात अंमलीपदार्थ व्यवहाराच्या तक्रारी
एएनसी विभागाने 18 तक्रारी नोंद केल्या असून गुन्हा अन्वेषण विभागाने 13 तक्रारी नोंद केल्या आहेत. राज्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये मिळून हणजूण पोलीस स्थानकात सर्वाधिक म्हणजे 15 तक्रारी नोंद झाल्या आहेत. कळंगूट पोलीस स्थानकात 13 आगशी 1, कोलवाळ 3, म्हापसा 5, पणजी 3, पेडणे 8, पर्वरी 5, साळगाव 1, मुरगाव 1, वास्को 3, वेर्णा 3, फोंडा 3, मडगाव 3, मायणा कुडतरी 1, ओल्ड गोवा 1, फातोर्डा 1 तर काणकोण पोलीस स्थानकान 1 अशा तक्रारी नेंद झाल्या आहेत. यावरुन आपल्या लक्षात येते की अंमलीपदार्थाचा व्यवसाय केवळ किनारी भागातच नव्हे तर बहुतांश भागात सुरु आहे.
2021 सालातील नऊ महिन्यात म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर, या काळात 1 कोटी 69 लाख 75 हजार 700 रुपये किमंतीचा 83 किलो 657 ग्रॅम विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात 22 गोमंतकीय, 60 देशी नागरिक तर 13 विदेशी नागरिक मिळून एकूण 95 संशयितांना अटक करण्यात आली होती. एकूण 91 तक्रारी नोंद केल्या होत्या. एकूण गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या नऊ महिन्याच्या काळात ड्रग्ज प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. पुढील दोन महिने हे पर्यटन हंगामाचे असल्याने गोव्यात किती प्रमाणात ड्रग्ज आला आहे याची कल्पनाही करणे कठीण आहे.









