बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नव्या साईराज चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगावच्या नारायणी संघाने अटीतटीच्या लढतीत डीजे बॉईज व लोकमान्यचा तर एवायएम अनगोळने शिवनेरी स्पोर्ट्स व राजमुद्रा मंडोळी संघांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. विशाल शहा, अकिब पिरजादे, संतोष कासवातकर, रितेश जोशी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावरती खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लोकमान्य स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 63 धावा केल्या. त्यात दर्पणने 24 तर विशालने 22 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगावच्या नारायणीने 3 षटकात एक गडी बाद 66 धावा करून सामना नऊ गड्यानी जिंकला. त्यात विशाल शहाणे 5 षटकारासह नाबाद 44, जीवेशने 14 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात शिवनेरी स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्व गडी बाद 43 धावा केल्या. त्यात संदीपने 13 धावा केल्या. एवायएम अनगोळतर्फे संतोषने दोन तर रोहित व वैभव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना 3.3 षटकात 1 गडी बाद 49 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात आकिबने 2 षटकारासह 24, अंकितने 14 धावा केल्या.
तिसऱ्या सामन्यात डीजे बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 98 धावा केल्या. त्यात संतोष एस. पी. ने 3 षटकारासह नाबाद 55 तर आकाशने 16 धावा केल्या. बेळगावच्या नारायणीतर्फे आदर्श व साहिल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगावच्या नारायणी संघाने 8 षटकात 3 गडी बाद 98 धावा केल्या. त्यात रितेशने पाच षटकारासह 35, जितेशने 3 षटकारासह 26 तर जयेशने 15 धावा केल्या. डीजे बॉईजतर्फे संतोष व आकाशने प्रत्येकी एक गडी बाद केला. सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर नियमाचा वापर केला. त्यामध्ये डीजे बॉईजने पाच चेंडूत 2 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना नारायणी संघाने दोन चेंडूत सात धावा करून सामना जिंकला. चौथ्या सामन्यात राजमुद्रा मंडोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 39 धावा केल्या. त्यात सचिनने 19 धावांची योगदान दिले. एवायएम अनगोळतर्फे संतोष व रोहित यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एवायएम अनगोळने 2.4 षटकात 3 गडी बाद 41 जमा करून सामना सात गड्यांनी जिंकला. त्यात अंकितने 16 तर नवाजने 12 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शंकर गणाचारी, केदारी कणबरकर, आनंद पाटील, आप्पाजी दळवी, गजानन फगरे, आनंद चव्हाण, महेश फगरे, शुभोद गावडे, अजित गरगट्टी, जोतीबा गिलबिले यांच्याहस्ते विशाल शहा, अकिब पिरजादे, संतोष कासवातकर, रितेश जोशी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेनिसबॉल क्रिकेटपटू आज बेळगावात
टेनिसबॉल जगतातले दिग्गज क्रिकेटपटू गुरुवारी बेळगावात साईराज चषक क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघातून खेळण्यास येत आहेत. या संघात थॉमस डायस, अमित मोहिते, सोहम सिंग, राकेश कहर व सुनील चावरी हे खेळाडू येणार असून षटकार व चौकार मारण्याची यांची ख्याती आहे. या खेळाडूंचा बेळगावकरांना खेळ पाहण्यास मिळणार आहे. तरी क्रिकेटशौकीनांनी खेळाचा आनंद लुटावा, असे आवाहन साईराज स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी पदाधिकारी व संयोजक महेश फगरे यांनी कळविले आहे.
गुरुवारचे सामने
- राहुल के. आर. शेट्टी रायगड विरुद्ध स्टार इलेव्हन, सकाळी 9 वा.
- बेलगाव बॉईज विरुद्ध एसआरएस हिंदुस्थान अनगोळ यांच्यात सकाळी 10 वा.
- नील बॉइज विरुद्ध एवायएम अनगोळ यांच्यात सकाळी 11 वा.
- पहिल्या सामन्यातील विजेता विरुद्ध इंडियन बॉईज यमकनमर्डा यांच्यात दुपारी 12 वा.
- कांतारा बॉईज विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 1 वा.









