दिल्ली ओपन : आनंदबाटला सात्विकला ‘ब’ विभागात विजेतेपद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ग्रँडमास्टर एस. एल. नारायणन आणि अभिजित गुप्ता यांनी दिल्ली आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत एक रोमांचक बरोबरी साधली, तर आनंदबाटला सात्विकने ‘ब’ विभागात विजेतेपद पटकावले. सात्विक 10 पैकी 9 गुण मिळवून विजेता ठरला. त्याने 800 हून अधिक खेळाडूंना मागे टाकले. त्याने 4 लाख ऊ. जिंकले असून भारताच्या हौशी बुद्धिबळ स्पर्धेतील आतापर्यंतचे हे सर्वोच्च प्रथम पारितोषिक आहे. सुंदरम कुमार आणि शेख सोहिल यांनी अनुक्रमे 3 लाख आणि 2 लाख ऊ. मिळविताना दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
दरम्यान, ‘अ’ विभागातील सामन्यात नारायणन आणि अभिजित यांनी बरोबरी साधली. दोन्ही खेळाडूंनी उच्च दर्जाच्या युक्त्या वापरल्या, पण कोणीही पुढे जाऊ शकले नाही. प्रत्येकी अर्ध्या गुणामुळे शेवटच्या चार फेऱ्यांकडे जाताना त्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीतील आपले स्थान मजबूत केले आहे. आणखी एका बहुप्रतीक्षित सामन्यात ग्रँडमास्टर विटाली सिवुक (स्वीडन) आणि ग्रँडमास्टर अलेक्सी फेडोरोव्ह (बेलारूस) यांनीही त्यांचा सामना बरोबरीत सोडविला आणि अपराजित वाटचालीचा विक्रम कायम ठेवला. 6 पैकी 5 गुण मिळविलेल्या खेळाडूंच्या गटात ते सामील झाले आहेत.
ग्रँडमास्टर दिप्तयन घोष आणि इंटरनॅशनल मास्टर नीलाश साहा यांनीही सामना बरोबरीत सोडविला. कोणताही एक आघाडीचा खेळाडू नसल्याने किताबासाठीची शर्यत खुली असली, तरी अनेक ग्रँडमास्टर जेतेपदाच्या जवळ पोहोचलेले आहेत.









