वारणानगर / प्रतिनिधी
Narayan Rane News : मराठी लोक उद्योग क्षेत्रात कमी पडत आहेत. महाराष्ट्रात उद्योग वाढावेत यासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू असून,विशेषतः महिला उद्योजिका निर्माण होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे असे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यानी सांगीतले. कोडोली ता.पन्हाळा येथील राणे गटाचे विश्वासू नेते स्व.अशोकराव पाटील यांचे सुपूत्र चि.अजिक्य पाटील यांच्या विवाह प्रसंगी ना.राणे सपत्नीक आले होते. विवाह समारंभापूर्वी ते वारणा साखर कारखाण्याच्या विश्रामगृहावर दाखल झाले त्यावेळी राणे यांचे स्वागत माजी मंत्री आ.डॉ.विनय कोरे यांनी केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले, महाराष्ट्र प्रगत राष्ट्र असूनही उद्योगात देशात चौथ्या स्थानावर आहे. यामध्ये मराठा उद्योजक कमी आहेत. शासन अद्योग व्यवसाय वाढवण्यास करीत असलेले प्रयत्न,उद्योग धोरण,योजना व अनुदान याची माहिती महाराष्ट्रात सर्वापर्यन्त पोहचत नाही. महाराष्ट्रातील तरुणांनी उद्योग निर्माण करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यानी सांगीतले. विशेषतः महिला वर्गाने पुढाकार घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे. महिलांना उद्योगासाठी सहाय्य करण्यासाठी महिलांचे मेळावे आयोजीत केल्यास उद्योग विभागाचे सर्व अधिकारी व आपण स्वत्ता उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन सहकार्य करण्यासाठी येवू असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगीतले.
महाराष्ट्रात सर्वच प्रकारचे उद्योग वाढावेत यासाठी गट -तट व पक्ष,राजकारण विरहीत काम करण्यास प्राधान्य दिले असून, आपल्या स्वत्ताच्या अधिकारात २५० कोटी रू.पर्यन्तच्या उद्योगांना मंजूरी देता येते. त्यामुळे मी मागेल त्यास उद्योग निर्माण करण्यास सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.यावेळी महिला उद्योगासाठी मेळावा घेण्याचे आश्वासन आमदार विनय कोरे यांनी राणे यांना दिले.