पुणे / प्रतिनिधी :
अनेक परदेशी उद्योग महाराष्ट्रात येत असतात. मग बारसूतील प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांचा विरोध का? बारसू प्रकल्पाला सुपारी घेऊनच विरोध केला जात असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील तब्बल 71 हजार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देशभरातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातदेखील केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, आपल्याला उद्योग कसे येतात माहिती आहे का? बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले पाहिजे, की ते का विरोध करत आहेत? कोळश्यापासून वीज बनवणारे 34 उत्पादक हे उद्धव ठाकरे यांना भेटले होते. तेव्हादेखील त्यांनी विरोध केला होता. आताही विरोधच करत आहेत.
16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा पोपट मेलेला आहे आणि खरा दबाव हा विधानसभा अध्यक्षांवर आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, संजय राऊत संपादक आहेत. ही भाषा त्यांना शोभते का? पोपट शिवसेनेत होता. तेव्हा तो जिवंत होता, भरारी घेत होता. पंखांवर काहीतरी घेऊन मातोश्रीमध्ये जात होता. तेव्हा चांगला होता आणि आता पोपट मेला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी असो. मुख्यमंत्र्याला एक स्टेटस आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी अपशब्दाने बोलू नये. मात्र, ठाकरे व राऊत सध्या डिप्रेशनमध्ये गेले आहेत, असा टोला राणे यांनी लगावला.
पंतप्रधान मोदी यांनी 22 ऑक्टोबर 2022 पासून रोजगार मेळा हा कार्यक्रम जाहीर केला. मोदी सरकारकडून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 लाख नोकऱया दिल्या जाणार आहेत. सरकारने आतापर्यंत 3 लाख नोकऱया दिल्या आहेत, अशी माहितीही राणे यांनी या वेळी दिली.








