वृत्तसंस्था/बेंगळूर
2025 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर दक्षिण विभागाने उत्तर विभागाविरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 297 धावा जमविल्या. सलामीच्या नारायण जगदीशनने नाबाद शतक (148) झळकविले. या सामन्यात जगदीशनने 2 षटकार आणि 13 चौकारांसह 260 चेंडूत नाबाद 148 धावा झळकविल्या आहेत. जगदीशनसमवेत हैद्राबादच्या तन्मय अगरवालने सलामीच्या गड्यासाठी 103 धावांची भागिदारी केली. त्यामध्ये अगरवालचा वाटा 43 धावांचा होता. अगरवाल बाद झाल्यानंतर जगदीशन आणि कर्नाटकाचा देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची शतकी भागिदारी केली. देवदत्त पडिकल 57 धावांवर तर जगदीशन 148 धावांवर खेळत आहेत. दक्षिण विभागाने पहिल्या डावात 81 षटकात 3 बाद 297 धावा जमविल्या. उत्तर विभागाच्या कंबोजने 47 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : द. विभाग प. डाव 81 षटकात 3 बाद 297 (नारायण जगदीशन खेळत आहे 148, पडिक्कल खेळत 57, अगरवाल 43, कंबोज 1-47)









