मणिशंकर अय्यर यांचा खळबळजनक आरोप : माजी पंतप्रधानांना संबोधिले सांप्रदायिक
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांना ‘सांप्रदायिक’ ठरविले आहे. तसेच अय्यर यांनी राव यांना देशातील ‘भाजपचे पहिले पंतप्रधान’ असे संबोधिले आहे. स्वत:ची आत्मकथा ‘मेमोयर्स ऑफ ए मावेरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941-1991)’मध्ये माजी राजनयिक अधिकारी अय्यर यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यात यावी अशी भूमिका मांडली आहे. जेव्हा देशाचा मुद्दा येतो, तेव्हा आमच्याकडे त्याच्या विरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्याचे साहस असते, परंतु टेबलवर बसून कुठल्याही पाकिस्तानीसोबत चर्चा करण्याची हिंमत नसते, असे त्यांनी नमूद केले आहे. स्वत:च्या आत्मचरित्रात अय्यर यांनी टून स्कूलपासून सेंट स्टीफन्स कॉलेज आणि कॅम्ब्dिराज विद्यापीठापर्यंतचा तसेच एका राजनयिक अधिकाऱ्यापासून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय होण्यापर्यंतचा प्रवास नोंदविला आहे. अय्यर हे 1985-89 पर्यंत राजीव गांधी यांच्या पीएमओत कार्यरत होते.
राजीव गांधींची चूक
राजीव गांधी यांनी राम मंदिराचा केलेला शिलान्यास चुकीचा होता असे माझे मानणे आहे. राजीव गांधींनी आर.के. धवन यांना पीएमओत स्थान देऊन भयंकर चूक केली होती, धवन यांनी पीएमओचे राजकीयकरण केले होते. धवन हे प्रत्यक्ष राजकारणात न उतरता सल्ला देत होते, असा दावा अय्यर यांनी केला आहे.
राजीव गांधी यांचा विश्वासू सहकारी नव्हतो
राजीव गांधी हे पंतप्रधान होणार असल्याची घोषणा अचानक करण्यात आल्याने मला आश्चर्य वाटले होते, कारण इंडियन एअरलाइन्सचा एक वैमानिक देश कसा चालवू शकतो असा प्रश्न माझ्या मनात उद्भवला होता. परंतु राजीव गांधी हे कशाप्रकारे देश चालवत आहेत हे पाहून मी त्यांची प्रशंसा करू लागलो असा दावा अय्यर यांनी केला आहे. माझ्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीत मी राजीव गांधींशी संबंधित बोफोर्स अन् शाहबानो प्रकरणाचा उल्लेख करणार आहे. राजीव गांधींचा मी विश्वासू सहकारी नव्हतो. मी राजकीयदृष्ट्या अनुभवहीन असल्याचे राजीव गांधींचे मानणे होते. त्यांनी माझ्याकडून कधीच सल्ला घेतला नाही. राजीव गांधी हे एक चांगले व्यक्ती होते. ते प्रामाणिक, स्पष्टवक्ते आणि तत्ववादी होते. त्यांच्यात व्ही.पी. सिंह यांच्याप्रमाणे बेरकीपणा आणि मोहम्मद खान यांच्यासारखी चतुरता नव्हती असा दावा अय्यर यांनी केला आहे.
पी.व्ही. नरसिंह रावांवर टीकास्त्र
अय्यर यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासोबत झालेल्या कथित संभाषणाचा आत्मचरित्रात उल्लेख केला आहे. मी राम-रहीम यात्रेत सहभागी झालो असता राव यांनी या यात्रेबद्दल कुठलाच आक्षेप नसल्याचे सांगितले होते, परंतु नरसिंह राव यांनी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येबद्दल असहमती दर्शविली होती. धर्मनिरपेक्षतेच्या माझ्या व्याख्येत काय चूक आहे अशी मी विचारणा केली होती. यावर राव यांनी हा एक हिंदू देश आहे हे तू का समजून घेत नाहीस असे म्हटले होते. राव यांची भूमिका पाहता भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हे तर राव हेच होते. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान झालेल्या नरसिंह राव यांनी मला राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला, परंतु सोनिया गांधी यांच्यामुळे मी राजकारणात टिकून राहिलो, असे अय्यर यांनी म्हटले आहे.









