अध्याय विसावा
भगवंत उद्धवाला नरदेहाचं महत्त्व समजावून सांगताना म्हणाले, नरदेहप्राप्ती ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. केवळ नरदेहातच ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे सुलभ असते हे लक्षात घेऊन माणसाने सदैव दक्ष रहावे म्हणजे त्याचे कल्याण होते. रात्रंदिवस आयुष्य कमी कमी होत असते. काळ हा वय खातच असतो. यात आयुष्याचा घात होतो, हे लक्षात आणून व नरदेह हा पतन पावणार हे जाणून घरादाराविषयी उदासीन व्हावे. देहाचा क्षणभंगुरपणा लक्षात आणून देहाभिमान सोडून भक्ति ज्ञान संपादन करण्यासाठी अत्यंत जागृत रहावे. वैराग्ययुक्त भक्ति केली म्हणजे देहाभिमानाची निवृत्ती होते. देशाभिमान नाहीसा झाला की, ज्ञानसंपत्ती घरात शिरते आणि मग चारही मुक्ति पायाला लागतात. ह्याप्रमाणे निजात्मप्राप्ती झाली म्हणजे प्रवृत्ती आपोआपच बंद पडते. नरदेहाला येऊन पुष्कळ लोक आत्मानंदसुखाला पात्र झालेले आहेत. असे असता जे मूर्ख लोक हे सुख साध्य करीत नाहीत, ते आत्मघातकी होत. सर्व फळांची प्राप्ती करून देणारे पण मिळण्यास अत्यंत कठीण असे मानवशरीर ही एक सुदृढ नाव आहे. गुरूंना तिचे कर्णधार करून आणि मलाच अनुकूल वायू करून जो मनुष्य या संसारसागरातून पार होत नाही, तो आत्मघातकीच होय. चौऱयांशी लक्ष जीवयोनी आहेत. त्यात मनुष्यदेहाशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. नरदेहाने माझी प्राप्ती होते, म्हणून या देहाला ‘आद्य’ असे म्हटले आहे. याची प्राप्ती होणे फार कठीण आहे. मोठय़ा भाग्यानेच नरदेह प्राप्त होत असतो. सुदृढ म्हणजे सर्व अवयवांनी युक्त, कोठेही व्यंग नाही, बहिरा नाही, अंध नाही, पंगु नाही की मुका नाही ह्याप्रमाणे सर्वांगांनी संपूर्ण असा देह आणि तोही भरतखंडांत प्राप्त होणे हे मोठय़ा भाग्याचे लक्षण होय. त्यातून अंतःकरणांत परमार्थाविषयीचा विवेक असेल, तर त्याचा मी परमात्मा आज्ञाधारक होऊन राहतो. प्रत्यक्ष मी परमात्माच त्याचा आज्ञाधारक असल्याने तेथे इतर देवांचा व मनुष्याचा पाड काय? पण हा नरदेह पुन्हा प्राप्त होणार नाही. कारण नरदेह मिळणे परम कठीण असते.
पुण्य आणि पाप तोलले असता जेव्हा समसमान भरते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो हे लक्षात ठेव. असा नरदेहच पुन्हा आपल्याला मिळावा, म्हणून कोणीही जोखून कर्माचरण करू शकत नाही. काही ना काही कर्म हातून घडून पुण्य अधिक झाले तर स्वर्ग भोगणे अवश्य पडते आणि पातकाचे माप अधिक भरल्यास अनिवार नरक भोगावा लागतो. अशी कर्माची गती मोठी गहन आहे. ह्यात काकतालीय न्यायानेच संसारसमुद्र तरून जाण्याचे महान् तारू असे जे मनुष्यपण, ‘सुलभ’ म्हणजे अविकल व ‘सुकल्प’ म्हणजे विचार-शील ह्याला पैलतीरास नेणारा कुशल नावाडी असा एक गुरुच आहे. गुरु हा निजगुज कानात सांगतो म्हणूनच त्याला ‘कर्णधार’ असे म्हणतात. कानाला धरताच म्हणजे कानात महावाक्मयाचा उपदेश करताच भक्तांचा उद्धार होत असल्यामुळे गुरु हाच सर्वथैव ‘कर्णधार’ होय. संसारसमुद्रामध्ये नरदेह हेच तारू आहे. तेथे सद्गुरु तोच कर्णधार म्हणजे सुकाणूवाला आहे. तसेच पैलथडी पोहोचवायला मी श्रीहरि हा अनुकूल वाहणारा वायु आहे. गुरु हा कर्णधार किती कुशल असतो म्हणून सांगू? भोवरे, खळाळाचे पाणी, हेलकावे, विकल्पाचे कल्लोळ व पाण्याचे एकामागून एक येत असलेले लोंढे या सर्वांस चुकवून तो आपली नौका झपाटय़ाने पुढे काढतो. विवेकाची वल्ही लावून कर्माकर्माचे पाणी तोडले जाते व भजनरूप शिडाच्या बळावर नौका मोठय़ा वेगाने चालत असते. कामक्रोधादि थोर थोर मासे आमिष मिळविण्याकरितां टपून बसलेले असतात. त्यावर शांतीचे जाळे टाकून तो आपले तारू मोठय़ा शिताफीने चालवतो. वाटेत सारूप्यादि मुक्तींची बंदरे लागतात, तेव्हा त्या तारवामध्ये अनुहत वाद्यांच्या तुताऱया जयजयकाराने गर्जू लागतात. सलोकतेच्या पेठेला तारू नेले तर ते कदाचित् उलथून पडेल, समीपतेच्या मार्गाला लावले तर ते दोन्ही बाजूला कलंडू लागेल या सगळय़ाचा विचार सद्गुरूंच्या मनात कायम चालू असतो.
क्रमशः