सीआयडी करणार चंद्राबाबू यांच्या पुत्राची चौकशी
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर त्यांचे पुत्र अन् तेदेप महासचिव नारा लोकेश यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने अमरावती इनर रिंग रोड घोटाळ्याप्रकरणी नारा लोकेश यांचा अंतरिम जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळला आहे. राज्य सीआयडीने या घोटाळ्याच्या चौकशीकरता नारा लोकेश यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगणार आहे. सीआयडी अधिकाऱ्यांनी लोकेश यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे.
नारा लोकेश यांनी उच्च न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने हा अर्ज फेटाळत लोकेश यांना सीआयडी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा निर्देश दिला आहे. इन रिंग रोडच्या आदेशात बदल करत लोकेश यांनी वैयक्तिक स्वरुपात लाभ उचलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. एन. चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर नारा लोकेश हे अडचणीत येण्याची चिन्हे असल्याने तेदेपसमोर मोठे राजकीय संकट उभे ठाकणार आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने तेदेपला घोटाळ्यांचे आरोप खोडून काढणे आवश्यक ठरणार आहे.









