व्यवस्था ग्रामस्थांच्यावतीने व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत
वाशी : 32 युगापूर्वी विठ्ठल साक्षात प्रकट झाले असा उल्लेख करवीर महात्म्य या ग्रंथामध्ये आढळून येतो. अशा प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदवाळ येथे आषाढी यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी व देवस्थान समितीने नेटके नियोजन केले आहे.
देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास बाळकृष्ण पाठक व सदस्य यांच्यावतीने गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय, दर्शन रांगा व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विषयी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. आषाढी वारीसाठी कोल्हापूर जिह्यामधून तसेच आसपासच्या परिसरामधून मोठ्या प्रमाणात वारकरी व वारकरी दिंड्या येत असतात. त्यांची व्यवस्था ग्रामस्थांच्यावतीने व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.
यामध्ये कोल्हापूर, राधानगरी रोडवरील वाशी येथून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर गारगोटी रोडवरील गिरगाव फाटा व जैताळ फाटा येथून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथून मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर येथून नगर प्रदक्षिणा करून सकाळी सात वाजता कोल्हापूर ते नंदवाळ अशी रौप्य महोत्सवी आषाढी वारी दिंडी निघणार आहे.
यामध्ये सुमारे 50 हजार पेक्षा अधिक वारकरी सहभागी होणार आहेत. या दिंडीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून चांदीचा रथ देण्यात येणार आहे. हा चांदीचा रथ वारीचे आकर्षण असणार आहे. नंदवाळ येथील विठ्ठल मंदिराची सजावट ग्रामपंचायत व देवस्थान समिती यांच्या वतीने करण्यात येणार आहे.
नंदवाळ येथील यात्रेची सुरक्षा व्यवस्था दृष्टीने पोलीस प्रशासनाच्या वतीने इस्पुर्ली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शेख यांच्या वतीने परिसराची पाहणी केली आहे. नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भक्तांच्या वाहनांसाठी वाशी येथील खत कारखान्याजवळ पार्किंगची व्यवस्था केली आहे.








