शनिवारी दिवसभर अधूनमधून कोसळल्या सरी : मोठ्या पावसाची प्रतीक्षा
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाने दडी मारल्यामुळे चातकाप्रमाणे पावसाची सारेच वाट पहात होते. शनिवारी पावसाचे आगमन झाले. शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. शहराच्या पश्चिम भागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे जास्त होते. पूर्व भागात मात्र पाऊस कमी असल्याचे दिसून आले. आगमन झाले तरी पावसाला म्हणावा तसा जोर नाही. त्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा होत आहे.
पिकांना काहीसे जीवदान
या पावसामुळे पिकांना काहीसे जीवदान मिळाले. मात्र अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. भात, सोयाबिन पिकांना हा पाऊस जीवदान देणारा ठरला तरी ऊस, बटाटा तसेच इतर पिकांना दमदार पावसाची गरज आहे. येत्या एक-दोन दिवसांत दमदार पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाच्या आगमनामुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पावसामुळे हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झाला. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे.
हवामान खात्याने दि. 23 जूनपासून मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजानुसार शनिवारी पावसाचे आगमन झाले. मात्र पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याचे दिसून आले. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. जोरदार पाऊस आला तरच दिलासा मिळणार, अन्यथा पिकांचेही नुकसान होणार आहे

ढगाळ वातावरण
शुक्रवारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी सकाळपासून पावसाचा शिडकावा होत होता. दुपारी 12 च्या सुमारास काही प्रमाणात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे पावसाला जोरदार सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
पावसाला सुरुवात झाल्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांनी रेनकोट व छत्रींचा आधार घेतला. मात्र पावसाला जोर नसल्यामुळे रेनकोट परिधान करावा की नको, अशा संभ्रमात सारेजण अडकले होते. येत्या दोन दिवसांत दमदार पाऊस कोसळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.









