वेली उगवल्याने तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती, स्वच्छतेची मागणी
वार्ताहर /नंदगड
नंदगड येथील कमल तलावाची दोन वर्षात खोलबंदी व दुऊस्ती करण्यात आली होती. परंतु यावषी पुन्हा या तलावात वेली व गवत उगवल्याने तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या तलावाची लवकरात लवकर स्वच्छता करावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. नंदगड पोलीस स्टेशनपासून बाजारपेठेपर्यंतच्या रस्त्यादरम्यान कमल तलाव आहे. तलावाचा बांध असलेल्या ठिकाणांच्या बांधावरून हा रस्ता आहे. त्यातच तलावाच्या लगत क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची समाधी आहे. ही समाधी पाहण्यासाठी या रस्त्यावरून व या तलावाकडे लोक येत असतात. संगोळ्ळी रायण्णाचा तलाव म्हणूनच या तलावाकडे अलीकडे पाहिले जाते. पंचवीस वर्षांपूर्वी या तलावाची खोलबंदी करण्यात आली होती. त्यानंतर गत दोन वर्षांपासून या तलावाची खोलबंदी करण्यात येत आहे. शिवाय तलावाच्या चारी बाजूंनी फुटपाथ, मध्यंतरी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. येथे बऱ्यापैकी विकासकाम सुरू आहे. याबाबत येथील जनतेत समाधानाचे वातावरण असले तरी तलावात प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही वेली व गवत उगवल्याने पुन्हा तलावात पूर्वीप्रमाणेच घाण साचणार काय, हाच प्रश्न स्थानिक जनतेतून निर्माण होत आहे.









