माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा भाजपवर घणाघाती आरोप
खानापूर : देशात व राज्यात भाजपचे सरकार पाच वर्षे असतानासुद्धा क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांची समाधी असलेल्या नंदगड गावच्या विकासासाठी भाजपने एक रुपयाचाही निधी दिला नाही. संकल्प यात्रेनिमित्त मात्र भाजपला नंदगडची आठवण आली. ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर केला. नंदगडहून बिडी येथे काँग्रेसची प्रजाध्वनी यात्रा काढण्यात आली. बिडी येथे काँग्रेसची भव्य सभा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अंजली निंबाळकर होत्या. व्यासपीठावर माजी मंत्री सतीश जारकीहोळी, माजी मंत्री जमीर अहमद, प्रकाश राठोड आदींसह काँग्रेसचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेसतर्फे 3 फेब्रुवारीपासून प्रजाध्वनी यात्रेला सुरुवात झाली आहे. यापूर्वी मी मुख्यमंत्री असताना अन्नभाग्य, क्षिरभाग्य, मैत्री, मनस्विनी, विद्याश्री, शुभाग्य, पशुभाग्य, इंदिरा कॅन्टीन, मातृश्री तसेच अनेक विविध योजना राबवून समाजातील सर्व घटकांसाठी प्रयत्न केला आहे. आगामी निवडणुकीत राज्यात काँग्रेस सत्तेवर येणार आहे. यापुढील काळात प्रत्येकाला 10 किलो मोफत तांदूळ, कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी जनतेने काँग्रेसच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, मी स्वतःच्या प्रयत्नाने खानापूर येथे 60 बेडचे हॉस्पिटल, हलशी, कोडचवाड, बैलूर येथे विद्युत स्टेशन व 600 हून अधिक शाळाखोल्या मंजूर करून आणल्या. यावेळी माजी मंत्री सतीश जारकीहोळी व माजी मंत्री जमीर अहमद यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला तालुक्यातून महिलांसह अनेक लोक उपस्थित होते.









