नंदगड / वार्ताहर :
खानापूर तालुक्यात होत असलेली खतासाठीची टंचाई लक्षात घेऊन नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्याला एक युरियाचे पोते देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खत घेण्यासाठी बुधवारी दिवसभर मार्केटिंग सोसायटीच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
तालुक्यात अनेक खत दुकाने आहेत. सदर खाजगी खत दुकानदार निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम घेऊन खताची विक्री करत होते. सदरचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता.त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष निर्माण झाला होता. खाजगी दुकानदाराकडून करण्यात येणारी शेतकऱ्यांची लूट पाहून खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीने खताची विक्री करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून गेल्या पंधरा दिवसापासून करण्यात येत होती. याची दखल नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतली. त्याला खानापूरचे सहायक कृषी संचालक डी.बी. चव्हाण यांचीही साथ मिळाली.
बुधवारी एका दिवसात अनेक शेतकऱ्यांना खत देण्यात आले. शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार यापुढेही उपलब्ध साठ्यानुसार शेतकऱ्यांना खत देण्यात येणार असल्याचे मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन श्रीशैल माटोळी व व्यवस्थापक अभय पाटील यांनी सांगितले.









