सकाळी 7 वाजून 11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर अक्षतारोपण : लाखो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज : प्रशासन सज्ज
खानापूर : गेले वर्षभर गाजत असलेली नंदगडची लक्ष्मी यात्रा आता केवळ एक दिवसावर येऊन ठेपली आहे. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी संपूर्ण नंदगड गाव सज्ज झाले आहे. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायीक असलेल्या नंदगड वासियांचे गेल्या आठ दिवसापासून नंदगड येथे आगमन होत आहे. तसेच यात्रा कमिटीनेदेखील लक्ष्मी यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. लक्ष्मी गदगेच्या ठिकाणी भव्य राम मंदिराची प्रतिकृती निर्मितीचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. लक्ष्मी देवीचा विवाह सोहळा बुधवारी सकाळी 7.11 मिनिटानी लक्ष्मी देवी मंदिराच्या आवारात होणार आहे. लग्न सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकाना मंदिरापर्यंत पोहचता येणे शक्य नसल्याने नंदगड गावात 16 ठिकाणी विवाह सोहळा पाहण्यासाठी डिजिटल स्क्रीन बसवले जाणार आहे. तसेच विवाह सोहळा युट्युबवर लाईव्ह पाहता येणार आहे.
या विवाह सोहळ्यानंतर विधीवत गाऱ्हाणे, संग्या बांधणे आदी कामे पूर्ण होताच साधारण सकाळी 8 वाजता लक्ष्मी मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. या दृष्टीने लक्ष्मी यात्रा कमिटीने नियोजन केले आहे. यात्रेसाठी संपूर्ण घरोघरी तयारी देखील पूर्ण झाली आहे. लक्ष्मी गदगा मंदिर परिसरात भव्य अशा राम मंदिराची प्रतिकृती करण्यात आली आहे. तसेच गदगा परिसरात विविध प्रकाराची दुकाने घातली आहेत. सदर यात्रा परिसरात ज्यांच्या खुल्या जागा आहेत. त्यांनीदेखील भाड्याने देण्यासाठी दुकानांची तयारी केली आहे. लक्ष्मी यात्रा परिसरात शेतीवाडीत लहान मुलांच्यासाठी पाळणे व इतर करमणुकीची साधणे तसेच ब्रेक डान्स, बोटींग, खेळणीची दुकाने, रेशींग कार, फास्टफुड, हॉटेल, आईस्क्रीम दुकान, मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. एकूणच यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
तीन महिन्यांपासून यात्रा विधी पूर्ण
यावेळी यात्रेची माहिती देताना अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून यात्रापूर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आल्या आहेत. दि. 6 रोजी शेवटचा अंकी घालण्याचा विधी पार पडला. सदर यात्रा दि. 12 ते दि. 23 फेब्रुवारीपर्यंत भरणार आहे. दि. 12 ते 15 फेब्रुवारीपर्यंत लक्ष्मी गावातून फिरणार आहे. त्यानंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत धार्मिक विधी करुन दुपारी 3 वाजता लक्ष्मी देवीची मूर्ती रथात बसवण्यात येणार आहे. त्यानंतर देवी रथातून फिरविण्यात येणार आहे. कामाण्णा खुट्ट येथे देवीचा रथ मुक्कामाला राहणार आहे. त्यानंतर दि. 16 रोजी सकाळी 7 वाजता मिरवणुकीला सुरवात होऊन ओट्या घेत देवी गदगेकडे मार्गस्थ होणार आहे. यानंतर सायंकाळी 4 नंतर गदगेवर स्थानापन होणार आहे. यानंतर या ठिकाणी देवीला मान देण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत देवीचा बळ फिरविण्यात येणार आहे. यानंतर मुख्य यात्रोस्तवाला सुरवात होणार आहे. या यात्रोत्सवाच्या काळात यात्रा कमिटीच्यावतीने कुस्ती, करमणुकीचे कार्यक्रम, नाटक यासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात्रा परिसरात सीसी कॅमेरे
यात्राकाळात देवीच्या दर्शनाला भाविक वर्ग मोठ्या प्रमाणात येणार असल्याने भाविकाना लक्ष्मी देवीचे दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी दर्शन मंडपात सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. परिसरात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत किंवा चोऱ्या होऊ नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली असून दर्शन मंडपात तसेच यात्रा परिसरात यात्रा कमिटीने सीसी कॅमेरे बसवले आहेत. यात्राकाळात वाहने मोठ्या प्रमाणात येणार असल्याने हल्याळकडून येणाऱ्या वाहनाना एपीएमसी सोसायटीच्या मैदानावर तसेच बेळगावकडून येणाऱ्या वाहनाना एमजी कॉलेज मैदानावर तसेच हलशी परिसरातून येणाऱ्या पट्टीशिवारात वाहने पार्पिगची सोय करण्यात आली आहे. यात्राकाळात आरोग्य सुविधा व्यवस्थित राहण्यासाठी यात्रेच्या ठिकाणी दवाखाना उभारण्यात आला आहे. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून तसेच कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठे सहकार्य मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होण्याची शक्यता
अलीकडील यात्रांचे स्वरुप बदलल्याने यात्रोत्सवात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने नंदगड यात्रा काळात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेला धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पाडला आहे. यात नंदगडवासियांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता यात्राकाळात मोठ्या प्रमाणात पै. पाहुणे, सगे सोयरे, मित्र परिवार आणि भाविक मोठ्या प्रमाणात नंदगडात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.









