विविध कार्यक्रमांचे आयोजन : यात्रा तब्बल बारा दिवस चालणार
खानापूर : नंदगड, ता. खानापूर येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रा तब्बल 25 वर्षानंतर होत आहे. यात्रा उत्सव कमिटीने महालक्ष्मी यात्रोत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 12 ते 23 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या यात्रोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. सलग बारा दिवस यात्रोत्सव होणार असल्याने यात्रा कमिटीने भाविकांसाठी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. तसेच गदगेच्या ठिकाणी राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. संपूर्ण नंदगड गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यात्रा कमिटीने आहेर आणि मानपान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे नातेवाईकांनी यात्रेसाठी येताना आहेर आणू नये, असे आवाहन केले आहे.
महालक्ष्मी देवीची यात्रा विवाह समारंभाने होणार आहे. बुधवार दि. 12 रोजी पहाटे 3 ते 7 वाजेपर्यंत होम व अभिषेक, सकाळी 7.11 मिनिटानी सूर्योदयाला अक्षतारोपण. त्यानंतर मानाच्या मंदिरांना भेटी दिल्या जाणार आहेत. दुपारी 12 वा. जुनेगाव, वतनदार व मानकरी यांची भेट व ओटी समारंभ होणार आहे. गुरुवार दि. 13 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत नंदगड गावातील ओट्या भरणे समारंभ, शुक्रवार दि. 14 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी ओट्या भरणेचा कार्यक्रम, शनिवार दि. 15 रोजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत गावातील ओट्या भरणेचा कार्यक्रम. सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत लक्ष्मी देवीचे रथावर विराजमान, दुपारी 3 ते 7 वा. पर्यंत रथोत्सवाला सुरवात होऊन रात्रीचा मुक्काम कामण्णा खुट्टावर होईल. रविवार दि. 16 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत रथोत्सव व देवी गदगेवर विराजमान होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 देवीला मान देणे, सायंकाळी 6 ते 11 बळ फिरविणे.
सोमवार दि. 17 रोजी महाआरती, पूजा कार्यक्रम, श्री लक्ष्मी देवीचे दर्शन, ओट्या, श्रीफळ वाढविणे, दुपारी 2 वा. जंगी कुस्ती मैदान, सायंकाळी 8 ते 8.30 पर्यंत महाआरती, पूजा कार्यक्रम व लक्ष्मी देवीचे दर्शन होणार आहे. मंगळवार दि. 18 ते शुक्रवार दि. 21 पर्यंत रोज पूजा व ओट्या भरणे कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 22 रोजी श्री लक्ष्मी देवीच्या सभोवती सवाद्य आंबिल गाडे फिरविण्यात येणार आहेत. रविवार दि. 23 रोजी सायंकाळी 4 वाजता देवीला गदगेवरुन उठवून मिरवणूक व सीमेकडे प्रयाण आदी कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे. मंगळवार दि. 25 रोजी श्री लक्ष्मी देवीची मंदिरात प्रतिष्ठापना व ग्रामस्थांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.









