मंत्रघोषात सकाळी 7.11 वाजता विवाह सोहळा उत्साहात : पहाटेपासूनच मंदिरासमोर भाविकांची उपस्थिती
वार्ताहर/नंदगड/हलशी
नंदगड (ता. खानापूर) येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाला हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रदीर्घ कालावधीनंतर सुरुवात झाली आहे. बुधवारी पहाटे सूर्योदयाला लक्ष्मीदेवीचा विवाह सोहळा थाटात पार पडला. देवीचा विवाह सोहळा व मिरवणूक याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी पहाटेपासून नंदगड व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. नंदगड येथील लक्ष्मीदेवीची यात्रा होणार असल्याने महिन्याभरापासून ग्रामस्थ यात्रेच्या तयारीत गुंतले होते. यात्रेनिमित लक्ष्मी मंदिरासह गावातील अन्य मंदिरांना व घरांना रंगरंगोटी तसेच प्रत्येक गल्लीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लक्ष्मी मंदिराला फुलांच्या माळांनी व दिव्यांच्या आराशीने सजविले आहे. यात्रोत्सव बुधवार दि. 12 ते रविवार दि. 23 पर्यंत साजरा होत आहे. या काळात विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यात्रोत्सवानिमित्त भल्या पहाटे महिलांनी आपापल्या घरासमोर सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या. बुधवारी सकाळी देवीचा विवाह सोहळा होणार असल्याने पहाटे 3 पासून देवीच्या मूर्तीला सजविण्यात आले. या कालावधीत विविध धार्मिक कार्ये पार पडली. पहाटे 4 वाजल्यापासूनच महिला व भाविक गटागटाने लक्ष्मी मंदिराकडे येत होते. नवी वस्त्रs व अलंकार घालून महिला सहभागी झाल्या होत्या. युवकांनी विविध प्रकारचे ड्रेस परिधान केले होते. सकाळी 7 वाजेपर्यंत लक्ष्मी मंदिर परिसर, रेमणू गल्ली, बाजारपेठ, कलाल गल्ली, मठ गल्ली तसेच कॉलेज रोड, कोंडे हॉटेल, वरची गल्लीसह जागा मिळेल तेथे भाविक विवाह सोहळा आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी गर्दी करून थांबले होते. त्यामुळे जिकडे पाहावे तिकडे भाविकांचे थवे दिसत होते. लक्ष्मीमंदिरात भटजींच्या मंत्रघोषाने सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी देवीचा विवाह सोहळा यथासांग पार पडला. यात्रा कमिटीच्यावतीने ध्वनिक्षेपकावरून उपस्थित सर्वांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात येत होते.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
नंदगड लक्ष्मीयात्रेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुचाकी, चार चाकी, ट्रॅक्टर, इतर वाहनांनी तसेच चालत भाविक पहाटेपासूनच लक्ष्मीमंदिराकडे येत होते. यावेळी गावात रहदारीला अडथळा नको म्हणून मंदिराकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांना बंदी घालण्यात आली होती. पूर्व भागातून येणारी वाहने एपीएमसीच्या खुल्या जागेत पार्क करण्यात येत होती. खानापूर परिसरातून येणारी वाहने हेब्बाळ परिसरात तर नागरगाळी व हलशी परिसरातून येणाऱ्या भाविकांची वाहने गावाजवळील शेतवडीत पार्क करण्यात येत होती.
आजी-माजी आमदारांची उपस्थिती
लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळ्यासाठी तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले होते.
देवीची पारंपरिक मिरवणूक
देवीचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर रेमणू गल्लीतील युवकांनी लक्ष्मीदेवीच्या मिरवणुकीला सुरुवात केली. बुधवारपासून चार दिवस गावच्या विविध भागातील गल्ल्यांमधून मिरवणूक निघणार आहे. लक्ष्मीदेवीची मूर्ती भक्कम लाकडी खांबांवरील बैठकीवर ठेऊन 30 ते 40 युवक देवीला खांद्यावरून मिरवत होते. जुन्या रुढी व परंपरेनुसार सुरुवातीला गावातील विविध देवदेवतांची भेट, मानकऱ्यांच्या ओट्या व त्यानंतर ग्रामस्थांच्या ओट्या स्वीकारण्यात आल्या. मिरवणुकीत धनगरी ढोल व पारंपरिक वाद्ये तसेच तुतारीची व्यवस्था केली होती. त्यामुळे संपूर्ण गाव दणाणून गेले होते.









