ओटी भरण्यासाठी महिलांची दिवसभर गर्दी
नंदगड : येथील लक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव 12 ते 23 फेब्रुवारीपर्यंत साजरा झाला. यानिमित्त लक्ष्मीदेवीची मूर्ती मंदिराबाहेर गदगेवर स्थापना करून देवीचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला होता. दरम्यान, या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. यात्रोत्सव समाप्तीनंतर देवीची मूळ मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानुसार मंगळवार दि. 25 रोजी पहाटे देवीच्या मूर्तीला पूर्ण स्वरुप देऊन सकाळी 7 वा. यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील दांपत्याच्या यजमानपदाने लक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर नंदगड ग्रामस्थांच्या, माहेरवाशिणी व पै-पाहुण्यांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम झाला. रात्री 9 वाजेपर्यंत ओट्या भरण्यासाठी मंदिरात महिलांची गर्दी झाली होती. दिवसभर नंदगड ग्रामस्थांनी मंदिरात हजेरी लावली होती.









