लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : समाजकंटकांकडून धरणाचे दरवाजे उघडण्याचा प्रकार : कायमस्वरुपी कर्मचारी नेमणुकीची मागणी
वार्ताहर/हलशी
नंदगड गावच्या पश्चिमेला डेंगर कपारीत निर्माण केलेल्या धरणात पाणीसाठ्याचे योग्य नियोजन लघुपाटबंधारे खात्याकडून करण्यात आले नसल्याने तसेच काही समाजकंटकांकडून धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. याच पद्धतीने धरणाचे दरवाजे उघडल्यास संपूर्ण धरण रिकामी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे या धरणावर नंदगड परिसरात असलेली पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने याबाबत गांभीर्याने घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि या ठिकाणी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी नंदगड ग्रामस्थांतून होत आहे.
गेल्या पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात पाणीसाठा होता. धरण तुडुंब भरलेले होते. धरणाचे दोन्ही कालव्याचे दरवाजे नादुरुस्त झाले होते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याचा निचरा होत होता. या नादुरुस्त दरवाजांची दुरुस्ती करून पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी नंदगडवासियांकडून वेळोवेळी केली होती. मात्र लघुपाटबंधारे खात्याने या धरणाकडे दुर्लक्ष केल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. या धरणाच्या पाण्यावर शेतकरी उन्हाळी पिके घेतात.
गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून धरणाचे दरवाजे उघडण्याचे प्रकार वेळोवेळी होत आहेत. त्यामुळे धरणातील पाणी मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. जर याचप्रकारे धरणाचे पाणी सोडण्याचे प्रकार झाल्यास आठच दिवसात धरणातील पाणीसाठा संपण्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी लघुपाटबंधारे खात्याने तातडीने दरवाजांची दुरुस्ती करावी आणि दोन महिन्यांसाठी तरी कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.









