पिंपरी / प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथून थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयापर्यंत फेरी काढण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनीही अर्ज दाखल केल्याने आघाडीत बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, मावळचे आमदार सुन्ली शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम आदी उपस्थित होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, राष्ट्रवादीतील इच्छुक अकरा जणांनी एकत्रित येत पक्षाबाहेरील इच्छुकाला उमेदवारी देवू नये, पुरस्कृत करु नये, असा ठराव केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे ‘घडय़ाळया’च्या चिन्हावरच निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली. या घडामोडींमुळे सामेवारपर्यंत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव निश्चित होत नव्हते. त्यानंतर अखेरच्या क्षणी म्हणजेच मंगळवारीसकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत माजी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र काम करतील आणि या निवडणुकीत विजयी संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा : थोरातांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली; प्रभारी एच. के. पाटील मुंबईकडे रवाना








