
पणजी : स्मार्ट सिटी अंतर्गत जुन्या गोमेकॉ इमारतीसमोर पणजीत कांपाल उद्यानाशी जोडून असलेल्या नव्या छोट्या पुलाला आता ‘योग सेतू’ हे नाव देण्यात येणार आहे. गोवा पायाभूत विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दै. ‘तरुण भारत’ला दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महामंडळाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या छोटेखानी पुलाची पाहणी केली. या पुलावऊन पुढे कांपाल उद्यानात जाता येईल. मांडवीच्या काठी बांधण्यात आलेल्या पदमार्गाचीही पाहणी त्यांनी केली. या पुलावऊन सायकल घेऊन जाता येईल व सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी हा मार्ग खुला होईल. वाटेत अनेक ठिकाणी बाकडे घालण्यात येतील. सकाळच्या शांत वातावरणात योग ध्यान करण्यासाठी या बाकांचा वापर करता येईल. त्यामुळे योग ध्यान हाच उद्देश समोर ठेवून या पुलाचे नाव देखील ‘योग सेतू’ असे केले आहे.









