वृत्तसंस्था/ ओशाकाती
दक्षिण आफ्रिकेपासून 1990 मध्ये नामीबियाला स्वातंत्र्य मिळवून देणारे सॅम नुजोमा यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले आहे. नुजोमा हे नामीबियाचे पहिले अध्यक्ष होते. तसेच देशाचे राष्ट्रपिता म्हणून त्यांना ओळखले जाते. नुजोमा यांच्या निधनाची घोषणा रविवारी नामीबियन अध्यक्ष नांगोलो म्बुम्बा यांनी केली आहे.
विंडहोएक येथील रुग्णालयात नुजोमा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नुजोमा यांच्या निधनामुळे नामीबियात शोक पसरला असल्याचे म्बुम्बा यांनी म्हटले आहे. नुजोमा यांना तीन आठवड्यांपूर्वी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नुजोमा यांनी नामीबियाच्या मुक्तिसंग्रामाच्या सर्वात संकटकाळात नेतृत्व केले होते. 1989 मध्ये आंदोलनाचे नेते म्हणून त्यांनी 30 वर्षे निर्वासनात काढली होती. 1990 मध्ये नामीबियाच्या स्वातंत्र्याची पुष्टी झाल्यावर त्यांना अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.









