चिपळूण :
जिल्हा वनविभागाच्यावतीने शहरातील कार्यालयाच्या आवारात रत्नागिरी जिल्ह्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या फोटो गॅलरी व सभागृहाची निर्मिती करण्यात येत आहे. या फोटो गॅलरीला निसर्ग, वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या जिल्ह्याचे माजी मानद वन्यजीव रक्षक कै. नीलेश बापट यांचे नाव द्यावे, अशी मागणी येथील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
जिल्ह्यातील विविध स्तरातील व्यक्ती, अर्थ फाऊंडेशन, ग्लोबल चिपळूण, सह्याद्री निसर्ग मित्र मंडळाचे संस्थापक निसर्गप्रमी भाऊ काटदरे, रंजीता चॅरिटेबल ट्रस्ट, शिवसेना युवासेनाचे अध्यक्ष निहार कोवळे, पक्षीप्रेमी नयनीश गुढेकर, निसर्गरक्षक, वाईल्ड लाईफ अनलिमिटेड, अग्रीमा महिला संघ, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, माजी उपनगराध्यक्ष निसर्गप्रमी बापू काणे यांसह विविध संस्थां व नागरिकांच्यावतीने वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री उदय सामंत, विभागीय वनाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देत जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कै. नीलेश बापट यांचे नाव वनविभागाच्या या फोटो गॅलरीला नाव देण्याची मागणी केली आहे. गेल्या २५ वर्षाहून अधिक वर्षे जनतेत वन्यजीवन शिक्षण या विषयात कार्यरत असलेल्या बापट यांचे गतवर्षी निधन झाले. ‘आरोही’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वन्यजीव क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून संस्थेमार्फत निसर्गविषयक अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले होते. यात निसर्ग छायाचित्र प्रदर्शन, वन्यजीव चित्रपट महोत्सव, स्लाईड शोज, पक्षी महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांचा समवेश होता. निसर्गक्षेत्रात काम करणारी आताची चिपळुणातील तरुणांची फळी तयार करण्यात बापट यांचा मोलाचा वाटा आहे. याशिवाय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात निसर्गविषयक अनेक कामेही त्यांनी केली होती. त्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी फोटो गॅलरीला नाव देण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.








