उत्तर कोरिया सरकारचा तेथील पालकांना फर्मान
उत्तर कोरियात पालकांना स्वतःच्या मुलांना ‘बॉम्ब’, ‘गन’ आणि ‘सॅटेलाइट’ अशाप्रकारची नावे देण्यास सांगण्यात आले आहे. आईवडिलांनी स्वतःच्या मुलांची अधिक वैचारिक आणि सैन्यवादी नावे ठेवावीत. अत्यंत साध्या नावांचा वापर टाळावा असे सरकारचे म्हणणे आहे.
स्थानिक लोकांशी साधलेल्या संवादाच्या आधारावर रेडियो फ्री एशियाने हा दावा केला आहे. यापूर्वी उत्तर कोरियाने स्वतःच्या नागरिकांना दक्षिण कोरियासारख्या लव्हेबल नावे म्हणजेच ए आरआय (प्रेम करणारा) आणि सु मी (अत्यंत सुंदर) वापरण्यास अनुमती दिली होती. परंतु आता शासनाकडून अशपाकारच नावे असलेल्या लोकांना अधिक देशभक्त आणि वैचारिक नावे ठेवावी लागतील अन्यथा दंड ठोठावण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे.
नकार दिल्यास दंड
पालकांनी स्वतःच्या मुलांची नावे पीओके वन (बॉम्बचे नाव), चुंग सिम (निष्ठा) आणि उई सोन्ग (उपग्रह) यासारखी नावे ठेवावीत अशी उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग-उन यांची इच्छा आहे. जर कुणा व्यक्तीने याला नकार दिल्यास त्याला दंड ठोठावला जाईल तसेच त्याला समाजविरोधी घोषित करण्यात येणार आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी मागील महिन्यापासून देशभरातील लोकांना नोटीस बजावण्यात येत आहे. नावात सुधारणा करण्यासाठी लोकांकडे वर्षाच्या अखेरपर्यंतचा वेळ आहे. क्रांतिकारक निकष पूर्ण करण्यासाठी नावाचा राजकीय अर्थ काढला जावा असे लोकांना सांगण्यात आले आहे. परंतु या आदेशामुळे अनेक पालक नाराज असून ते नाव बदलण्यास टाळाटाळ करत आहेत. कुणा व्यक्तीला स्वतःचे नाव निवडण्याचेही स्वातंत्र्य कसे दिले जाऊ शकत नाही असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे.