खून, अपहरण, खंडणी प्रकरणात ‘वाँटेड’ : मुसक्या आवळण्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष, तब्बल दोन वर्षे बेळगावात राहून खंडणीसाठी अनेकांचे खून
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. कुख्यात गुंडांचा वावरही वाढला आहे. खास करून रिअल इस्टेट व्यवसायाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगार बेळगाव परिसरात सक्रिय आहेत. बेळगाव पोलिसांना मात्र या घडामोडींची ना खंत ना खेद, अशी परिस्थिती आहे. राजकीय दबावातून अनेक निरपराधांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात धन्यता मानणाऱ्या अधिकाऱ्यांना एकेकाळी बेळगावात धुमाकूळ घातलेल्या रशीद मलबारीचा विसर पडला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारी ऊर्फ मामू व त्याच्या साथीदारांनी बेळगाव, हुबळी-धारवाड, कारवार परिसरात अनेक गुन्हे केले आहेत. मंगळूर येथून सुटका झाल्यानंतर रशीदने बेळगावात आश्रय घेतला होता. स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळेपर्यंत तो येथून निसटला होता. अद्याप त्याचा थांगपत्ता लागला नाही.
वर्चस्वासाठी संघर्ष
वरुण गांधी व श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून 29 मार्च 2009 रोजी मंगळूर पोलिसांनी रशीदला अटक केली होती. त्यानंतर त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आले होते. याचवेळी छोटा राजनचा हस्तक युसुफ बच्चेखानही हिंडलगा कारागृहात होता. या दोघा जणांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष सुरू झाला. त्यामुळे या दोघांनाही वेगवेगळ्या कारागृहात हलविण्यात आले होते.
21 जुलै 2014 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहातून रशीदची सुटका झाली. त्यानंतर तो देशाबाहेर पळाला असणार या समजुतीत पोलीस अधिकारी होते. मात्र, रशीदने बेळगाव येथे सुरक्षित तळ ठोकला होता. तब्बल दोन वर्षे बेळगावात राहून खंडणीसाठी उद्योजक, बिल्डरांचे अपहरण करून अनेकांचे खून केल्याचे तब्बल दोन वर्षांनंतर उघडकीस आले होते.
बेळगाव येथील गुन्हेगारी कारवाया उघड होईपर्यंत रशीद नेपाळ किंवा पाकिस्तानमध्ये असणार, याच समजुतीत गुप्तचर यंत्रणा गाफील राहिली. एपीएमसी व माळमारुती पोलीस स्थानकात खून, अपहरण आदी प्रकरणे रशीदवर नोंद आहेत. कारवार जिल्ह्यातील यल्लापूर पोलीस स्थानकातही खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबरोबरच बेळगाव येथील काही राजकीय नेत्यांच्या खुनाचा कटही त्याने रचला होता.
14 मे 2017 रोजी सीसीबीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योजक रोहन रेडेकर (वय 23) या तरुणाचे अपहरण करून खून केल्याच्या आरोपावरून रशीदच्या सहकाऱ्यांना अटक केली. त्यांच्या जबानीतून रशीद मलबारीच्या बेळगाव येथील कारवायांवर प्रकाश पडला. तेव्हापासून बेळगाव पोलीस रशीदच्या मागावर होते. आता बेळगाव पोलिसांना त्याचा विसरच पडला आहे.
बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने पासपोर्ट
मध्यंतरी रशीदला अबुधाबीत अटक झाली होती. महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी त्याची खात्रीही करून घेतली होती. त्याला अटक झाली त्यावेळी त्याच्याजवळ बांगलादेशचा पासपोर्ट आढळला होता. अबुधाबी येथील प्रशासनाने बांगलादेश सरकारला त्यावेळी या कारवाईची माहिती दिली होती. आपण बांगलादेशचे रहिवासी असल्याचे सांगून त्याने बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने पासपोर्ट बनवून घेतल्याचेही उघडकीस आले होते. हॅकर आशिष रंजन (वय 36) मूळचा राहणार रांची, सध्या रा. वास्को-गोवा, अय्याजअहमद अब्दुल शेख खान (वय 35) रा. काजूबाग, कारवार या दोघा जणांचा खून करून रशीद मलबारी व त्याच्या साथीदारांनी मृतदेह टाकून दिले होते. आशिषचा मृतदेह सुंकनाळ, ता. अंकोलाजवळ तर अय्याजअहमदचा मृतदेह यल्लापूरजवळील अरबैलनजीक फेकून दिला होता. या प्रकरणी बेळगाव येथील तीन तरुणांना यल्लापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातही रशीद यल्लापूर पोलिसांना हवा आहे.
बेळगाव परिसरात खंडणीसाठी अनेकांना धमकावले
रशीदच्या साथीदारांना बेळगावात अटक झाली, त्यावेळी तीन खून, आठ ते दहा अपहरण प्रकरणे उघडकीस आली होती. प्रत्यक्षात रशीदला अटक झाल्यानंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येणार आहेत. दोन वर्षांच्या काळात रशीदने बेळगाव परिसरात खंडणीसाठी अनेकांना धमकावले होते. त्यातील काही जणांकडून खंडणी उकळलीही होती. टी. जी. कृष्णभट्ट पोलीस आयुक्त पदावर असताना रशीदच्या अटकेसाठी प्रयत्न झाले होते. त्यानंतर कोणीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता पुन्हा वेगवेगळ्या कारणाने बेळगाव परिसरात नामचीन गुंडांच्या कारवाया वाढल्या आहेत. यामागे स्थानिक गुंडांचा हात आहे की आणखी एखादा रशीद अवतरला आहे? याचा शोध पोलीस दलाला घ्यावा लागेल.









