हाताच्या बोटांची नखे वाढविण्याचा छंद असणे ही सर्वपरिचित स्थिती आहे. कित्येकजण वर्षानुवर्षे नखे न कापता ती वाढवितात आणि चांगली लांबलचक करतात. अशा व्यक्तींना समाजात वावरण्यास किंवा त्यांची दैनंदिन कामे करण्यातही या नखांचा अडथळा होतो. पण ते आपला छंद सोडत नाहीत. अशा व्यक्तींच्या नखाच्या लांबीची नोंद विक्रम पुस्तिकांमध्येही अनेकदा केली जाते.
व्हिएतनाम देशातील एक कलाकार लुयू कोंग हुएन याने नुकताच या संदर्भात जागतिक विक्रम केला आहे. गेली 34 वर्षे या व्यक्तीने आपल्या हाताच्या बोटांची नखे कापलेली नाहीत. त्यामुळे ती वाढून आता जवळपास सहा मीटर इतक्या लांबीची झालेली आहेत. नेमके सांगायचे तर त्यांच्या नखांची लांबी 594.64 सेंटीमीटर किंवा 19 फूट 6 इंज इतकी आहे. जिराफ या पृध्वीवरील सर्वात उंच प्राण्याच्या सरासरी उंचीएवढी त्यांची नखे झाली आहेत. त्यामुळे हा आतापर्यंतचा जागतिक विक्रम ठरला असून त्यांची नोंद निनीज विक्रम पुस्तिकेत करण्यात आली आहे. हुएन यांची महत्वाकांक्षा शिक्षक होण्याची होती. नखे वाढविल्यास आपण शिक्षक म्हणून अधिक शोभून दिसू, या भावनेने त्यांनी नखे वाढविण्यास प्रारंभ केला. नंतर त्यांना तो छंदच जडला. काहीही झाले तरी नखे कापायची नाहीत, असा निर्धार त्यांनी केला. त्यांची नखेही बळकट होती. कारण सर्वसामान्यांची नखे विशिष्ट लांबीची झाली, की ती अपोआप तुटतात किंवा झोपेत हालचाली झाल्या तरी तुटतात. पण हुएन यांनी तसे होऊ नये याची दक्षता घेतली होती. आता त्यांचे आपल्या नखांवर इतके प्रेम जडले आहे, की ती कापायची, या विचारानेच त्यांना अंगात ताप भरल्यासारखे होते. त्यामुळे त्यांनी ती तशीच ठेवली आहेत.









