वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अंतरिम प्रमुख नजम सेठी यांनी पीसीबीचे पुढील अध्यक्ष होण्याच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले असून पीसीबीमध्ये कायमस्वरूपी पद मिळविण्याच्या प्रयत्नात आपण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी देशातील सर्वोच्च राजकीय नेते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आसिफ झरदारी आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यातील वादाचा मुद्दा बनू पाहत नाही, असे सेठी यांनी म्हटले आहे.
या घोषणेमुळे झाका अश्रफ यांना पुन्हा पीसीबीचे अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मला आसिफ झरदारी आणि शेहबाज शरीफ यांच्यातील वादाचा मुद्दा बनायचे नाही. अशी अस्थिरता आणि अनिश्चितता पीसीबीसाठी चांगली नाही. अशा परिस्थितीत मी पीसीबीच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार नाही. सर्व संबंधितांना शुभेच्छा, असे रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये सेठी यांनी म्हटले आहे. या घडामोडीचा आगामी आशिया चषक आणि आयसीसी विश्वचषकावर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील दोन्ही पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी यांना मंडळाचे अध्यक्षपद आपापल्या उमेदवाराकडे गेलेले हवे असून त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ अलीकडच्या काळात गुंत्यात सापडले आहे.









