झमान-हलचे प्रत्येकी 3 बळी, लायन्स 2 बाद 166
वृत्तसंस्था/ कँटरबरी, इंग्लंड
करुण नायरचे शानदार द्विशतक, ध्रुव जुरेल व सरफराझ खान यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ संघाने इंग्लंडच्या लायन्स संघाविरुद्ध पहिल्या डावात 557 धावांचा डोंगर उभारला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लायन्सने पहिल्या डावात 39 षटकांत 2 बाद 166 धावा जमवित जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
करुण नायरची खेळी द्वितकानंतर संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याचा लाभ घेतला. नायरने 281 चेंडूत 26 चौकार, 1 षटकारासह 204 धावा काढल्या. झमान अख्तरने शार्दुल ठाकुरला (32 चेंडूत 27) बाद केले. हर्ष दुबे व अंशुल कंबोज यांनी दहा षटके टिकून राहत 39 धावांची भर घातली. जोश हलने दुबेला (47 चेंडूत 32) बाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर पाचच षटकांत भारत अ चा डाव 557 धावांत आटोपला.
तत्पूर्वी करुण नायरने 186 धावांवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि द्विशतक नोंदवत कसोटी संघासाठी दावा दाखल केला. एडी जॅकला चौकार ठोकत त्याने द्विशतक पूर्ण केले. आक्रमक खेळणारा जुरेल 94 धावांवर बाद झाला तर नितिश कुमार रे•ाr 7 धावा काढून बाद झाला. शार्दुलने फटकेबाजी केली तर कंबोजने 37 चेंडूत 23, हर्षित राणाने 16 धावा जमविल्या. जोश हल व झमान अख्तर यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले.
त्यानंतर इंग्लंड लायन्सचा बेन मॅकिने 16 धावा काढून बाद झाल्यानंतर सलामीवीर टॉम हेन्स व इमिलिओ गे यांनी 109 धावांची भागीदारी केली. गे 46 धावांवर बाद झाला. हेन्स 81 व मॅक्स होल्डन 17 धावांवर खेळत होते. यावेळी लायन्सने 39 षटकांत 2 बाद 166 धावा जमविल्या होत्या.
संक्षिप्त धावफलक : भारत अ सर्व बाद 557 : नायर 204, जुरेल 94, सरफराझ खान 92, हर्ष दुबे 32, अवांतर 30. झमान 3-73, हल 3-72. इंग्लंड लायन्स 39 षटकांत 2 बाद 166 : हेन्स खेळत आहे 81, गे 46, होल्डन खेळत आहे 17.









