तळमावले :
‘नाईकबाच्या नावानं चांगभलं’ असा जयघोष अन् गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत लाखो भाविकांच्या गर्दीत श्रीक्षेत्र बनपुरी (ता. पाटण) येथील नाईकबा देवाची यात्रा उत्साहात पार पडली.
तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल व विविध विभागाचे कर्मचारी मंदिर परिसरात यात्रेच्या नियोजनावर लक्ष ठेवून होते. महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तसेच बनपुरी व जानुगडेवाडी गावांचे ग्रामदैवत असणाऱ्या नाईकबा देवाच्या यात्रेनिमित्त नाईकबाचा डोंगरमाथा व परिसर भाविकांनी फुलून गेला होता. असंख्य भाविक मुक्कामाच्या तयारीने यात्रा स्थळावर दाखल होते.
पहाटे नाईकबाची आरती व पूजा करण्यात आली. त्यानंतर छबिन्याला सुरुवात झाली. छबिन्यात नाईकबाच्या पालखीसह विविध देवांच्या सासनकाठ्या ढोल-ताशांच्या तालावर नाचत होत्या. सासनकाठ्यांचे नयनरम्य दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. यात्रा परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली होती.








