भाजप-जेजेपी युती समाप्त, खट्टर लोकसभा उमेदवार होणार
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्रीपदावर नवीन नेत्याची निवड केली आहे. लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर आली असताना केलेले हे परिवर्तन राजकीय चर्चेचा विषय बनले आहे. तसेच गेली जवळपास साडेचार वर्षे राज्यात असणारी भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्षाची युतीही संपुष्टात आली आहे. मंगळवार या वेगवान आणि नाट्यामय घडामोडींमुळे गाजला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच हरियाणाची राजधानी चंदीगढ येथे जोरदार राजकीय हालचाली होताना दिसत होत्या. राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. तो त्वरित संमत करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बेठक घेण्यात आली. त्यात नवे मुख्यमंत्री म्हणून नायबसिंग सैनी यांच्या नावाला एकमुखी संमती देण्यात आली. या सर्व प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी दोन केंद्रीय निरीक्षकांची नियुक्त करण्यात आली होती. सैनी यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची विनंती दुपारी केली.
संध्याकाळी शपथविधी
संध्याकाळी सहा वाजण्याच्या आसपास नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनात करण्यात आला. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. त्यांच्यासह पाच मंत्र्यांचाही शपथविधी करण्यात आला आहे. कन्वर पाल, मूलचंद शर्मा, जयप्रकाश दलाल, बनवारी लाल आणि अपक्ष आमदार रणजीतसिंग चौताला यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यांचे विभाग नंतर घोषित केले जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ओबीसी नेत्याला मुख्यमंत्रीपद
नायबसिंग सैनी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने प्रथमच हरियाणात अन्य मागासवर्गिय नेत्यांला मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आहे. हरियाणात अन्य मागासवर्गीयांची संख्या 55 टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्रीपदी सैनी यांची निवड केल्याने भारतीय जनता पक्षाला यामुळे लाभ होईल असेही काही राजकीय तज्ञांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपला अपक्षांचा पाठिंबा
हरियाणात विधानसभेची सदस्यसंख्या 90 असून भारतीय जनता पक्षाचे 41 आमदार आहेत. जननायक जनता पक्षाचे 10 तर काँग्रेसचे 30 आमदार आहेत. अपक्ष आणि अन्य पक्षांचे 9 आमदार आहेत. आतापर्यंत या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीचे सरकार होते. मात्र, आता भारतीय जनता पक्षाला अपक्ष आणि इतरांपैकी 7 जणांनी पाठिंबा दिल्याने नव्या मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यात अडचण येणार नाही, असे दिसत आहे.
युती तुटली
मंगळवारीच घडलेल्या आणखी एक महत्वाच्या घडामोडी, राज्यात गेली जवळपास साडेचार वर्षे सत्तेत असणारी भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्षाची युती तुटली आहे. लोकसभेच्या जागावाटपावरुन मतभेद झाल्याने युती तुटल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जननायक जनता पक्षाने अधिक जागांची मागणी केल्याने युती चालविणे अशक्य होते. असे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्पष्ट केले. मनोहरलाल खट्टर यांना लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट दिले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप हरियाणातील उमेदवारांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी घोषित केलेली नाहीत.
नाट्यामय घडामोडी
ड साडेचार वर्षांची सत्ताधारी युती तुटल्याने राज्य सरकारचा राजीनामा
ड माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला मंत्रीमंडळासह सत्तात्याग
ड जननायक जनता पक्ष लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्याची शक्यता
ड मित्रपक्षाने अधिक जागा मागितल्याने युती तुटल्याचे करण्यात आले स्पष्ट









