महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा सहभाग : नेज नागझरी मैदानात हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती
वार्ताहर/ बेडकिहाळ
नेज (ता. चिकोडी) येथील बेडकिहाळ-शिरगांव मार्गावरील नागझरी मठ येथील जागृत दैवत चंद्रव्वाताई देवीची यात्रा 4 ते 8 अखेर विविध कार्यक्रमाने पार पडली. 7 रोजी दुपारी 4 वाजता कर्नाटक-महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या निकाली जंगी कुस्त्या झाल्या. मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी मल्ल सिकंदर शेख विरुद्ध दिल्लीचा मल्ल विक्रांत कुमार यांच्यात होणार होती. पण मल्ल गैरहजर असल्याने तो सामना रद्द झाला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश कव्वळी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल शुभम कोळेकर यांच्यात झाली. त्यामध्ये मल्ल संगमेश कव्वळी याने केवळ 8 सेकंदात मल्ल शुभम कोळेकरला आतील टांग डावावर चितपट करून नेज-नागझरी कुस्ती मैदान गाजविले. पंच म्हणून अनिल माने चिकोडी यांनी काम पहिले. तर ही कुस्ती अजयसिंह शितोळे सरकार यांच्यासह चंद्रव्वाताई यात्रा कमिटी, कुस्ती कमिटीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते लावण्यात आली.
दुपारी 4 वाजता मंदिराचे प्रमुख पुजारी, सिद्धाप्पा हणबर, बसवन्नी संगापगोळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आले. दरम्यान, अश्वाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मैदान पूजन अजयसिंह शितोळेसरकार, अजित वडेर व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कुस्ती श्रेयश कुडाळकर व बाबू कट्टीकर यांच्यात लावण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन मल्ल प्रकाश पाटील-इंगळगी व मल्ल उदयकुमार-हरियाणा यांच्यात झाली. हा सामना बरोबरीत सोडविण्यात आला. पंच म्हणून बाबासाब कागे यांनी काम पाहिले. चौथी कुस्ती मल्ल लसूण भागवत विरुद्ध मल्ल कमलजित सिंह-पंजाब यांच्यात झाली. हा सामना कमलजित पंजाब याने जिंकला. पंच म्हणून लक्ष्मण निंबाळकर यांनी काम पहिले. तर अॅड. संतोष वडेर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष आप्पासाब सुटट्टी, राजू किवड यांच्या हस्ते लावण्यात आली.पाचव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल संजय इंगळगी विरुद्ध मल्ल पृथ्वीराज खरात यांच्यात झाली. ही कुस्ती अखेर बरोबरीत सोडविण्यात आली. पंच म्हणून दगडू चिंचणे यांनी काम पहिले. ही कुस्ती सदलगा पोलीस स्टेशनचे एएसआय एस. एम. सनदी, पोलीस साहाय्यक बडोदे यांच्या हस्ते लावण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल ऋषिकेश बानगे व मल्ल पार्थ कंग्राळी यांच्यात झाली. त्यात बानगे विजयी झाला. पंच म्हणून कल्लाप्पा शिंगाडे यांनी काम पहिले. ही कुस्ती ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, कुमार बेडगे यांनी लावली.
सातव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल संतोष हारुगेरी व मल्ल किरण पाटील यांच्यात झाली. ही कुस्ती हारुगेरी याने जिंकली. पंच म्हणून बसू घोडगेरी यांनी काम पहिले. ही कुस्ती अनिल माने, स्वातंत्र्य सैनिक रामगोंडा मुदायी यांनी लावली. आठव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल बाळू शिंदीकुरबेट व मल्ल विनायक वास्कर यांच्यात झाली. त्यात शिंदीकुरबेट विजयी झाला. नवव्या क्रमांकाची कुस्ती मल्ल कार्तिक इंगळगी व मल्ल अमित कांबळे, ढोणेवाडी यांच्या झाली. त्यात इंगळगी विजयी झाला. ही कुस्ती बाबासाब कागे, अरुण बोणे, प्रकाश मगदूम, राजू पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी मल्ल हर्षद दानोळे, कुबेरसिंग रजपूत, हणमंत घोडगेरी, विराज कुंभार, सूचित तराळ, मनोज धारवाड, संतोष चिंचणे, राकेश जलालपूर, शिवतेज सरकार, अक्षय पवार, प्रज्ज्वल पाटील व अर्जुन कोळेकर यांच्यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील अनेक कुस्त्या झाल्या. यावेळी बेडकिहाळ, खडकलाट, गळतगा, बेळगाव, सदलगा, कोल्हापूर, कुस्ती कमिटीचे सदस्य, पंचक्रोशीतील मान्यवर, कुस्ती शौकीन, ग्रामस्थ उपस्थित होते.
कुस्ती मैदानाच्या यशस्वीतेसाठी बाबासाब गायकवाड, लक्ष्मण निंबाळकर, सिद्धाप्पा हणबर, बसवराज संगापगोळ, सुरेश सुळकुडे, अजयसिंह शितोळेसरकार, संजय कांबळे, परशुराम नाईक, रावसाब वडेर, अप्पासाब वडेर, आण्णाप्पा चनगौडनवर, सुरज वडेर, राजू किवड, अजित नाईक, अजित वडेर, जयपाल वडेर, दगडू चिंचणे, बाबासाब कागे यांच्यासह यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. इचलकरंजीचे मल्ल सुकुमार माळी यांनी मराठीत तर कुंतल वडेर यांनी कन्नडमध्ये निवेदक म्हणून काम पाहिले. हलगीसाथ रवी आवटे यळगूड यांनी दिली.









