संशयितांनी महाराष्ट्रात पळ काढल्याचा संशय
बेळगाव : रामनगर-व•रवाडी येथील युवकाच्या खुनाचे धागेदोरे सापडले आहेत. खुनानंतर संशयित आरोपी महाराष्ट्रात पळून गेल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र व गोव्यात प्रयत्न सुरू आहेत. एक-दोन दिवसांत आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. बुधवार दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास नागराज इराप्पा गाडीव•र (वय 26) रा. रामनगर व•रवाडी या युवकाचा शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलजवळ भीषण खून करण्यात आला होता. बेसावधपणे पायी चालत जाणाऱ्या नागराजवर पाठीमागून फरशीने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. खुनाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांचे सहकारी संशयितांच्या शोधासाठी झटत आहेत. खुनानंतर संशयित आरोपींनी कोल्हापूरच्या दिशेने पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी बेळगाव पोलिसांचे एक पथक महाराष्ट्राला पाठविण्यात आले आहे. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांच्याशी संपर्क साधला असता युवकाच्या मारेकऱ्यांचा सुगावा लागला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळू, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.









