महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून घोषणा : दोन्ही राज्यांना पर्यटन, व्यापारात होणार फायदा,गोवा ते नागपूर अंतर केवळ आठ तासांचे
पणजी : नागपूर ते गोवा अशा ‘शक्तीपीठ एक्सप्रेस’ महामार्गाची घोषणा महाराष्ट्र सरकारतर्फे करण्यात आली आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र – कोकण आणि गोवा राज्य जोडले जाणार आहे. तसेच दोन्ही ठिकाणांमधील प्रवासाची वेळ 21 तासावऊन 8 तासांवर येणार आहे. हा महामार्ग एकूण 760 कि.मी. लांब असून तो सहा पदरी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ऊ. 75 हजार कोटी असून प्रवासाची वेळ 13 तासांनी कमी होणार असल्याचे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हा प्रकल्प साकारणार असून तो 2028 पर्यंत वाहतुकीस खुला करण्याची योजना आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवासाची वेळ आधीच कमी झाली असून आता या शक्तीपीठ महामार्गाने ती वेळ आणखी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले.
अकरा जिल्ह्यांतमधून जाणार शक्तीपीठ
या शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्रातील पूर्व, पश्चिम व दक्षिणेकडील 3 शक्तीपीठे, 2 ज्योतीर्लिंगे आणि इतर तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. हा महामार्ग एकूण 11 जिह्यातून जाणार असून त्यामुळे गोव्यासह विदर्भ, मराठवाडा, कोकणातील एकंदरित विकासाला, पर्यटनाला चालना मिळणार आहे. अनेक शक्तीपीठे जोडली जाणार असल्यामुळे सदर महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
शक्तीपीठ जोडणार ज्योतीर्लिंगे, तीर्थक्षेत्रे
तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूर आंबेजोगाई, औंध – नागनाथ, परळी – वैजनाथ, गुऊद्वारा हुजूर साहिब, सेवाग्राम, पवनार, लातूर, उस्मानाबाद, संत बाळूमामा – अदमपूर, कुणकेश्वर व गोव्यातील पत्रादेवी ही स्थळे शक्तीपीठ मार्गाने जोडली जाणार असल्याने अध्यात्मिक व धार्मिक पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे.
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना होणार मदत
या शक्तीपीठ महामार्गामुळे गोवा राज्याला मोठा लाभ होणार असून महाराष्ट्रातील नागपूर पर्यंतचे लोक 8 तासात गोव्यात पोहोचू शकतील. त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक वाढतील. सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी सरासरी 18 ते 21 तास लागतात. ती वेळ कमी करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे.
दोन्ही राज्यांच्या अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
या महमार्गाचे अनेक फायदे गोवा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना होणार आहेत. व्यापार तसेच आयात निर्यातीस मोठा वाव मिळणार असून मुंबई – पुणे या गजबजलेल्या शहरांना वगळून गोव्याकडे जाण्याचा पर्यायी मार्ग खुला होणार आहे. जलद वाहतूक करण्याचे साधन मिळणार असून ज्या ग्रामीण भागातून हा महामार्ग जाणार आहे तेथे विकासाच्या संधी वाढणार आहेत. रोजगार, व्यवसायाबरोबरच अनेक संधी उपलब्ध होणार असून दोन्ही राज्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा शक्तीपीठ महामार्ग भारत देशातील सर्वात लांब मार्ग ठरणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची घोषणा केली आहे.









