मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा : ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी मनोभावे केली वारुळाची पूजा : महिलांनी झोक्याचा आनंदही लुटला
वार्ताहर /किणये
तालुक्यात सोमवारी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागपंचमी सणानिमित्त रविवारी सायंकाळी घराघरांमध्ये नागाची मूर्ती आणण्यात आली होती. सोमवारी ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी वारुळाची मनोभावे पूजा केली. विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिसून आली. प्रत्येक वर्षींच्या हंगामातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. यंदा नागपंचमी श्रावणातील पहिल्या सोमवारी आल्यामुळे पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी असा योग आल्याने उत्साहाचे वातावरण दिसून आले. तालुक्याच्या विविध गावातील शिवस्वरूप मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा व भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती. सणानिमित्त रविवारी सायंकाळी शाडू व मातीच्या नागाच्या मूर्ती अळूच्या पानातून आणल्या. नागमूर्तीची विधीवत व पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला.
सकाळपासूनच अनेक गावातील शेतकरी वारुळांची पारंपारिक पद्धतीने पूजा करत होते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. त्यामुळे या नागदेवतेची सर्वत्र पूजा केली. अनेक गावातील शिवस्वरूप मंदिरांमध्ये नागाच्या मूर्तींना दुग्धाभिषेक घातला. लाह्या व इतर पदार्थांचा नैवेदही दाखविला. नागपंचमीनिमित्त ग्रामीण भागात पोहे, रवा, लाह्या, शेंगदाणे आदीपासून लाडू बांधणे, चिवडा तयार करण्याची परंपरा आजही जपली जाते. सणानिमित्त महिलांनी अंगावर आकर्षक शृंगार केला होता. काही गावांमध्ये महिला व मुलींनी झोक्याचा आनंद लुटला. शिवस्वरूप मंदिरांमध्ये रात्री जागर भजनाचे कार्यक्रम झाले.









