महाशिवरात्रीनिमित्त बडेकोळ्ळ मठात कार्यक्रम
बेळगाव : पावनक्षेत्र श्री बडेकोळ्ळ मठाचे नागेंद्र स्वामी हे शनिवारी अनगोळ येथे आले होते. यावेळी त्यांचे भक्तांनी स्वागत केले. येथील रघुनाथपेठ, मारुती मंदिर व नाथ पैनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला त्यांनी भेट दिली. श्रीक्षेत्र बडेकोळ्ळ मठ येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नागेंद्र स्वामी यांनी केले आहे. गुरुवार दि. 7 मार्च रोजी ध्वजारोहण, शुक्रवार दि. 8 रोजी पालखी महोत्सव, शनिवार दि. 9 रोजी गुरुपाद्या पूजा, रथोत्सव, महाप्रसाद, रविवार दि. 10 रोजी तुलाभार कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी दुपारी 4 वाजता कुस्त्यांचे आयोजन, सोमवार दि. 11 रोजी ध्वजविसर्जन व पालखी निरोप समारंभ व यात्रेची सांगता होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नागेंद्र स्वामी आल्यामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली होती. स्वामींचे पाद्यपूजन करून भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले. याचबरोबर प्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध गल्लीतील पंच मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.