कराड फलटणसह जिल्हय़ातील 5 पालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान
कमी पाऊस असणाऱया 92 पालिका, 4 नगरपंचायतींची निवडणूक जाहीर
कराड-राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या १७ जिल्हय़ातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. यानुसार सातारा जिल्हय़ातील कराड, फलटण, म्हसवड, रहिमतपूर, वाई या पाच नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे. यात सातारा, महाबळेश्वर व पाचगणी या नगरपालिकांचा समावेश नसून या पालिकांची निवडणूक दुसऱया टप्प्यात होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी २० जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी २२ जुलै ते २८ जुलै असा असून या दरम्यानच्या शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवारी अर्जांची छाननी २९ जुलैला होणार असून ४ ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लगतच्या निवडणूक चिन्ह वाटप होणार असून १८ ऑगस्टला मतदान होणार आहे. मतमोजणी व निकाल १९ ऑगस्टला होणार आहे.