महसूल अधिकारी–पीडीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण या दुर्गम भागातील अनेक गावांचा विकास गेल्या कित्येक दिवसांपासून खुंटला आहे. अशा गावांचा विकास व्हावा यासाठी सर्वतोपरी आदर्श ग्रा. पं. बनविण्याचा प्रयत्न करण्यात यावा, यासाठी नागरगाळी ग्रा. पं. ची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम भागातील गावांचा विकास होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या पीडीओंची बैठक आमदारांनी नुकतीच घेतली होती. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांसमोर कोणत्याही ग्राम पंचायतीची आदर्श ग्राम पंचायत निवड करण्यासंदर्भात बैठकीत प्रस्ताव ठेवला. यावेळी नागरगाळी ग्रा. पं. चे नाव पुढे आले. या नावाला उपस्थित सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संमती दर्शविली. नागरगाळी ग्राम पंचायतीमध्ये नागरगाळी, तावरकट्टी, बस्तवाड, बामणकोप, कुंभार्डा, चिंचेवाडी, सुवातवाडी, सुलेगाळी आदी गावांसह उम्रपाणी, कोसेकोप, गवळीवाडी (कृष्णनगर) आदी मजरे गावांचा समावेश येतो. ग्राम पंचायतीची एकूण 2700 लोकसंख्या आहे. वरील गावातून लोकसंख्या कमी असली तरी त्यांचा विस्तार मोठा आहे. सर्वच गावे डोंगराळ प्रदेशात मोडतात. पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य या सुविधा पुरवितानाही अनेक अडचणी उभ्या राहतात. तरीही तालुका पंचायत व तहसीलदारांकडून मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो.
बोअरवेल खोदाईसाठीही वनखात्याची आडकाठी
सध्या तावरकट्टी रेल्वे स्टेशन भागात पाण्याची समस्या आहे. येथे पाणी पुरवण्यासाठी विशेष योजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. कोसेकोप (गवळीवाडा) येथे पिण्याच्या पाण्यासाठी दोनवेळा बोअरवेल मंजूर झाली. परंतु हे गाव वनखात्याच्या हद्दीत येत असल्याने येथे बोअरवेल मारण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे येथील रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करीत आहेत. नागरगाळी ग्राम पंचायत हद्दीतील बरीच गावे धारवाड-पणजी रस्त्याच्या लगत आहेत. त्यामुळे येथे रस्त्याची काहीअंशी सोय झाली आहे. तर चिंचेवाडी व सुवातवाडी गावच्या संपर्क रस्त्याचे खडीकरण करण्यात आले आहे. नागरगाळी ग्रा. पं. हद्दीतील बस्तवाड व चिंचेवाडी गावात विद्यार्थी मिळत नसल्याने येथील प्राथमिक शाळेचा वर्ग विद्यार्थीअभावी बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येथील जनतेत शिक्षणाविषयी जागृती करण गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. नागरगाळी ग्रा. पं. हद्दीतील शिक्षण, आरोग्य, अंगणवाडी आदीच्या विकासाबाबत सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महसूल अधिकाऱ्यांनाही सूचना
तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या वाडवडिलांच्या नावे आहेत. अनेकांनी आपल्या नावावर त्या जमिनी करून घेतल्या नाहीत. त्यामुळे संबंधित वारसदारांच्या शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ होत नाही. त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी गावापर्यंत जाऊन त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून देण्यासाठी नियमानुसार प्रयत्न करावेत, अशी सूचनाही आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बैठकीला उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, महसूल व पंचायत खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख करून घेऊन त्यांच्या कामकाजांची माहिती आमदारानी करून घेतली. अधिकारी हे जनतेच्या कामासाठी ठेवलेले असतात. त्यामुळे जनतेची कामे ही अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवावी, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली.









