खानापूर शहरातील स्वच्छता-इतर व्यवस्था कोलमडली : जागोजागी कचऱ्याचे ढीग
खानापूर : कर्नाटक राज्य नगरसभा कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात खानापूर नगरपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सोमवारीही सुरूच ठेवले होते. त्यामुळे शहरातील स्वच्छता तसेच इतर व्यवस्था आणि नागरिकांची कामे ठप्प झाली असल्याने संपूर्ण व्यवस्थापन कोलमडले आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी सुटली आहे. मंगळवारपासून शहराचा पाणीपुरवठाही बंद करण्यात येणार असल्याचे खानापूर नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू जांबोटी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
कर्नाटक राज्य नगरसभा कर्मचारी संघटनेच्यावतीने नगरपंचायत, नगरसभा, नगरपालिकासह इतर स्थानिक स्वराज्य संस्था सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना के. जी. आय.डी. सेवेचा लाभ मिळावा, यासह इतर अनेक मागण्यांसाठी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरू होता. मात्र सरकारने दखल घेतली नसल्याने नगरपंचायत कर्मचाऱ्याच्या राज्यस्तरीय संघटनेने कामबंद आंदोलन् पुकारले असून मागील आठवड्यापासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खानापूर नगरपंचायतीने शुक्रवारपासून या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांची शासकीय कामे ठप्प झाली आहेत. तसेच शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने दुर्गंधी पसरली आहे. मंगळरवापासून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या आंदोलनस्थळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, नगरसेवक नारायण ओगले, प्रकाश बैलूरकर, रवि काडगी यासह शहरातील नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
नगरविकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या नगरसभा कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सोमवारी सायंकाळी कर्नाटक राज्य नगर विकासमंत्री आणि नगरसभा कर्मचारी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत नगर विकासमंत्र्यांनी नगरसभा कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली असून येत्या महिन्याभरात आपण याबाबत मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात चर्चा करून नगरसभा कर्मचाऱ्यांना निश्चित न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर नगरसभा कर्मचारी संघटनेच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळाने सकारात्मकता दाखवून सध्या सुरू असलेले कामबंद आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती खानापूर नगरपंचायतीच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजू जांबोटी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. मंगळवारपासून नगरपंचायतीचे कामकाज सुरळीत सुरू होणार आहे. शहरातील नागरिकांनी तसेच नगराध्यक्ष, नगरसेवकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपण आभारी आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.









