इंफाळ :
मणिपूरच्या सेनापति जिल्ह्यातील लायर गावात शनिवारी रात्री नागालँडमधील एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर गोळी झाडण्यात आली. घटनेवेळी हॉर्नबिल टीव्हीचा पत्रकार दीप सैकिया गावात एका पुष्पउत्सवाचे वृत्तांकन करत होता. तर गोळीबार करणाऱ्या आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. एका सांस्कृति कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना पत्रकारावर गोळी चालविणे त्याच्या वैयक्तिक जीवनावर हल्ला असण्यासह माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवरही थेट हल्ला असल्याची प्रतिक्रिया हॉर्नबिल टीव्हीचे संपादक जुथोनो मेकरो यांनी व्यक्त केली आहे. न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला महत्त्व देणाऱ्या समाजात प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांच्या विरोधात अशाप्रकारची हिंसा सहन केली जाऊ नये. नागालँड आणि मणिपूरचे सरकार, कायदा-अंमलबजावणी यंत्रणा आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी या गुन्ह्याचा निष्पक्ष तपास सुनिश्चित करावा असे आवाहन मेकरो यांनी केले आहे. आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांना त्वरित न्यायाच्या पिंजऱ्यात आणले जावे, जेणेकरून पत्रकारांच्या विरोधातील गुन्ह्यांना सहन केले जाणार नाही असा संदेश मिळू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे. तर हॉर्नबिल टीव्हीने पीडित परिवाराबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.









