सर्वच शिवालयांतून पहाटेपासूनच पूजा, अर्चा अन् धार्मिक कार्यक्रम
खानापूर : खानापूर तालुक्यात सर्वत्र उत्साहात नागपंचमी साजरी करण्यात आली. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने तालुक्यातील सर्वच शिवालयांतून पहाटेपासूनच पूजा, अर्चा सुरू होती. नागपंचमीनिमित्त महिलांनी मोठ्या उत्साहाने नागाची पूजा केली. सकाळपासूनच नागमूर्ती नेण्यासाठी कुंभाराच्या घरी गर्दी दिसत होती. तालुक्यात सर्वच सणांची परंपरा आजही जपली जाते. नागपंचमीनिमित्त माचीगड, कसबा नंदगड व खानापूर शहरातील नागलिंगेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त विशेष पूजेचे आयोजन केले होते. तालुक्यातील काही खेड्यातून रविवारी नागपंचमी साजरी करण्यात आली. तर शहरासह माचीगड, क. नंदगड, जांबोटी भागात सोमवारी नागपंचमी साजरी केली. माचीगड येथील पुरातन श्री सुब्रह्मणम मंदिरात नागपंचमीनिमित्त विशेष पूजचे आयोजन केले होते. यासाठी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भक्तांच्या हस्ते सुब्रम्हण्य मंदिरात अभिषेक करण्यात आला. दुपारी 12.30 नंतर महाआरती करण्यात आली. दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच कसबा नंदगडजवळील तलावाच्या बांधावर असलेल्या वारुळरुपी श्री व्हन्नव्वा देवी मंदिरात विशेष पूजेसाठी भाविकांची गर्दी होती. या ठिकाणीही विशेष पूजचे आयोजन करण्यात आले होते. खानापूर शहरातील निंगापूर गल्लीतील नागलिंगेश्वर मंदिरही पूजा, अभिषेक करण्यात आला. या ठिकाणीही भाविकांची दिवसभर दर्शनासाठी रिघ लागली होती. शिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागात नागपंचमी सणानिमित्त महिलांनी वारुळाची पूजा केली.
बेकवाड
बेकवाड येथे परंपरेप्रमाणे नागपंचमीनिमित्त नागचतूर्थी सण साजरा करण्यात येतो. या दिवशी शिवारात नव्याने तयार झालेल्या वाऊळला रिवाजाप्रमाणे पूजन करून दूध, पोहे, बेदाणे इत्यादी प्रकारचा नेवेद्य दाखवण्यात येतो. नंतर महाप्रसाद केला जातो.









