वृत्तसंस्था/ पॅरीस
पुढील आठवडय़ात येथे होणाऱया पॅरीस मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड राफेल नदालचे पुनरागमन होणार आहे. चालू वर्षाच्या टेनिस हंगामात नदालला वारंवार दुखापतीमुळे चांगलेच दमविले होते.
नदालने 2022 च्या टेनिस हंगामात प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले होते. त्याने ही स्पर्धा 14 व्यांदा जिंकली पण या स्पर्धेवेळी त्याला या दुखापतीचा त्रास चांगलाच जाणवत होता. दरम्यान त्याने वेदनाशामक इंजेक्शन घेऊन शेवटपर्यंत निर्धाराने खेळ करत विजेतेपद हस्तगत केले. तत्पुर्वी झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पायाला झालेल्या दुखापतीमुळे तो सहभागी होऊ शकला नव्हता. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत टिफोईकडून नदालला पराभव पत्करावा लागला होता. स्पेनच्या नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत विक्रमी 22 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या लेव्हर चषक सांघिक टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत तो रॉजर फेडरर बरोबर सहभागी झाला होता. टय़ुरीनमध्ये 13 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया एटीपी फायनल्स स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सरावाची गरज असल्याने त्याने पॅरीस मास्टर्स स्पर्धेत सहभागी घेण्याचा निर्णय घेतला आहे.









