वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या टेनिस हंगामातील जानेवारी महिन्यात मेलबोर्न येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वीच्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू राफेल नदालचे टेनिस क्षेत्रात पुनरागमन होत आहे.
राफेल नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 22 ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत पण चालू वर्षीच्या प्रारंभी झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत नदालला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. यानंतर तो स्पर्धात्मक टेनिस क्षेत्रातून अलिप्त राहिला होता. दुखापतीमुळे त्याला अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. जवळपास वर्षभरानंतर नदालचे पुनरागमन आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत होत आहे. 2024 च्या टेनिस हंगामानंतर नदाल आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपल्या तब्बल 20 वर्षांच्या टेनिस कारकीर्दीमध्ये नदालने आपला दर्जा सिद्ध केला होता. ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे रद्द करण्यात आली होती आणि आता ती तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा यावेळी 14 ते 28 जानेवारी दरम्यान घेतली जाणार आहे.









