वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या इटलीयन खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉप सिडेड राफेल नदालचे एकेरीतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. नवव्या मानांकित हुरकेझने त्याचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
तिसऱ्या फेरीतील सामन्यात हुबर्ट हुरकेझने नदालचा 6-1, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. नदालने यापूर्वीच आपल्या टेनिस क्षेत्रातील निवृत्तीचे संकेत दिले होते. आता आगामी होणारी फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा ही नदालची शेवटची राहिल. फ्रेंच टेनिस स्पर्धा 26 मेपासून पॅरिसमध्ये सुरु होणार असून सदर स्पर्धा 2024 च्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे.
हुरकेझचा पुढील फेरीतील सामना टॉमस इचेव्हेरी बरोबर होणार आहे. इचेव्हेरीने सिबोथचा 6-3, 7-5, रशियाच्या विद्यमान विजेत्या मेदव्हेदेवने जॅक ड्रेफरचा 7-5, 6-4 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकने रशियाच्या युलीया पुतिनसेव्हाचा 6-3, 6-4 तसेच जपानच्या नाओमी ओसाकाने कॅसेटकिनाचा 6-3, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.









